लिलाव तर झाले नाही… मग नवीन बांधकामास रेती येतेय कुठून…?

976

नागेश इटेकर
गोंडपिपरी, तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी :- तालुक्यातील रेती घाटाचे अजूनही लिलाव झाले नाही. मग तालुक्यात नवीन निवासाचे बांधकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी रेती येतेय तरी कुठून..? हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. जिथे-जिथे बांधकाम सुरु आहे तिथे-तिथे रेतीचे ढिगारेच ढिगारे दिसून येत आहे. याचा अर्थ रेती तस्करांकडून रातोरात रेतीची तस्करी होत असल्याचे समजते.
नव्यानेच रुजू झालेले तहसिलदार श्री. के. डी. मेश्राम यांनी आल्या-आल्याच रेती तस्करांवर कार्यवाहीचा बडगा उगारून बऱ्याच रेती घाटावरून रेतीची उपसा करत असताना आढळलेले ट्रॅक्टर , जे. सी.बी. सहित हायवा ट्रक जप्त करून लाखोंचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. त्यांची ती कामगिरी खरोखरच प्रशंनिय होती.

तालुक्यात रेती तस्करांची मोठी टोळी निर्माण झाली आहे. त्यात तालुक्यातील मोठ-मोठी व्यक्ती तसेच काही जण प्रतिनिधींचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे.काही निडर आणि कायद्याला केराची टोपली समजणारे असल्याने , रात्रौ बे रात्रौ मोठया प्रमाणात रेतीची खुलेआम चोरी होत आहे. अश्या अवैध वाळू तस्करांवर मात्र कुणाचेही अंकुश नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हि टोळी आधी नियोजित ठिकाणी रेतीची डम्पिंग करतात , त्या नंतर रेतीची विल्हेवाट लावतात. अश्या प्रकारे बेकायदेशीर रित्या रेतीची चोरी होत असल्याने शहरात ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे दिसून येत आहे. परिणामी प्रशासनाने वेळीच रेती घाटाचे लिलाव करून महसूल गोळा करावा अशी स्थानिकांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होत आहे.

लिलाव केव्हा होणार..? तालुक्यांतील रेती घाटांचे लिलाव लवकर झाल्यास शासनाला या मार्फत लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो. लिलावाची प्रक्रिया लांबत असल्याने रेती घाटामधून रेतीच्या तस्करीत दिवसेंदिवस वाढ होत आहे .तस्कर विविध शक्कल लढवून रेतीचे खनन करित लाखोंची कमाई करत आहेत. यावर आळा घालण्याची नितांत गरज आहे.