दोन अधिकारी सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात…एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी…

1497

बीड: दोन वर्गमित्र , दोघेही प्रशासकीय अधिकारी एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र हेच दोन मित्र सर्वत्र आज चर्चेचा विषय बनले आहेत. ही चर्चा त्यांच्या कामाची नाही किंवा कुठल्या पुरस्काराची नसून ते एक वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.

वर्गमित्र असलेले श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ या दोन्ही प्रशासकीय अधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात अडकले आहेत. गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

एसीबीने श्रीकांत गायकवाड यांना ६५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या चालकामार्फत त्यांनी ही लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एकदिवस आधी त्यांचे वर्गमित्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे मिसाळ यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर तेथून थेट माजलगावला गेले आणि माजलगावमध्ये आपल्या चालकामार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देखील अटक केली आहे. गायकवाड आणि मिसाळ हे दोघेही वर्गमित्र आता एसीबीच्या ताब्यात आहेत. सलग दोन दिवस केलेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.