चंद्रपूर: प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेनं पोलीसांत तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केली जात आहे.
संबंधित आरोपी प्रियकराचं नाव सन्मुखसिंग बुंदेल असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील रहिवासी आहे. याच शहरात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीसोबत आरोपीने हे गैरकृत्य केलं आहे. आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचं गिफ्ट देतो, असा बहाणा करत शहरालगत असणाऱ्या कारवा जंगलात नेलं. याठिकाणी आरोपी प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले.
यानंतर आरोपीने फेसबुकवर बनावट खातं काढून बलात्काराचे सर्व व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले. आरोपी प्रियकराने सोशल मीडियावर केलेल्या या संतापजनक प्रकरानंतर पीडित मुलीने थेट पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रियकर संबंधित मुलीला जातीवाचक शब्दात बोलायचा. आरोपीच्या या लज्जास्पद वागणुकीमुळे पीडितेनं आरोपीला लग्नास नकार दिला होता.
प्रेयसीने लग्नाला दिलेल्या नकार पचवता न आल्याने आरोपीने, ऐन वाढदिवसी गिफ्ट देण्याचा बहाणा करत जंगलात नेऊन सूड उगवला आहे. संबंधित घटना शुक्रवारी (4 जून रोजी) घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केल्यानंतर आरोपी प्रियकर सन्मुखसिंग बुंदेलला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.