नागपूरचा आनंद झाला राजराजेश्वरी…तरुणांवर लिंगबदल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार…

740

आपण चुकीच्या शरीरात जन्म घेतल्याची वेदना मला कळायला लागली तेव्हापासून सोसत होते. हे पुरुषी शरीर आपले नाही, याची जाणीव बालवयातच झाली होती. माझे मुलींसारखे वागणे घरीदारी सर्वांना खटकत होते. पण समजून कोणीच घेत नव्हते. अखेर घर सोडले आणि धर्मस्थळांचा आधार घेतला. सज्ञान झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात आले. वयाच्या तिशीनंतर मार्गदर्शक मिळाले. सावंगी मेघे रुग्णालयात योग्य उपचार मिळाले आणि एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली. मी एका जन्मातून मुक्त होऊन माझ्या मूळ रूपात आले आहे, याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, हे जाहीर उद्गार आहेत लिंगबदल शस्त्रक्रियेने आनंदची राजराजेश्वरी झालेल्या तरुणीचे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील आनंद (31 वर्षे) या व्यक्तीवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. समाजात सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने राजराजेश्वरी हे नवे नाव धारण करीत तिने माध्यमांशी संवाद साधला. राजराजेश्वरी म्हणाली, ‘लहानपणापासून अनेक कटू अनुभव वाट्याला आले. मी मात्र स्वतःची ओळख स्थापित करण्यासाठी लढायचे ठरवले. नागपुरात दीड वर्षाआधी एक शस्त्रक्रिया केली पण त्यात माझी फसवणूक झाली. शरीरापासून केवळ एक अवयव विलग करण्यात आला. ती माझी ओळख नव्हती. आता मला माझी खरी ओळख मिळाली आहे. सावंगी मेघे रुग्णालयाने माझ्यावर योग्य प्रकार लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रीया केली’ असे राजराजेश्वरीने यावेळी सांगितले.

मुलींनी मुलांचे कपडे घातले तर समाजात फारसा फरक पडत नाही. मात्र मुलांनी स्त्रीवेष धारण केला तर त्यांना हिणवले जाते, अशी खंत राजराजेश्वरीने व्यक्त केली. आपल्या अपत्यांमधील हे नैसर्गिक बदल वेळीच लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करा, असे आवाहनही तिने यावेळी केले.

ही पहिलीच शस्त्रक्रिया-डॉ. लामतुरे

लिंगपरिवर्तन घडविणाऱ्या व्हजायनोप्लास्टी म्हणजेच सेक्स रिअसायनमेंट शस्त्रक्रिया हिंदुस्थानात केवळ 51 सुपरस्पेशालिटी रुग्णालयात होत असून मध्य हिंदुस्थानातील ही कदाचित पहिली शस्त्रक्रिया असावी, असे शल्यचिकित्सक डॉ. यशवंत लामतुरे यांनी यावेळी सांगितले. आनंदची राजराजेश्वरी होण्याची ही प्रक्रिया पुढील सहा महिने सुरू राहणार असून येत्या काळात योग्य पद्धतीने हार्मोन्स वाढविणे, चेहऱ्याची जडणघडण करणे, आवाजबदल घडविणे, स्तनांना आकार देणे, स्त्रीलिंगनिर्मिती करणे, आदीबाबतच्या शस्त्रक्रिया टप्प्याटप्याने होणार आहेत, असेही डॉ. लामतुरे यांनी सांगितले. त्यांनी राजराजेश्वरीच्या धाडसाचे यावेळी कौतुक केले.

अपत्यांमधील नैसर्गिक बदल समजून घ्या- डॉ.पाटील

बालवयात होणारे शारीरिक नैसर्गिक बदल पालकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे. अन्यथा ही मुले खचून जातात. समाजाने हिणवले म्हणून मग काही मुले अनिच्छेने तृतीयपंथी होतात, तर काही थेट आत्मघाताचा मार्ग स्वीकारतात. मुलाचे मुलगी होणे यात त्या मुलाचा दोष नसतो. म्हणूनच हे बदल मोठ्या मनाने स्वीकारून त्यांचे जगणे समाजाने सुसह्य केले पाहिजे, असे डॉ. प्रदीप पाटील म्हणाले.