प्राप्त माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथे बिबट्याने चक्क गावात प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्यांना ठार केले. त्यातील एका शेळीला गोठ्यातच फस्त केले तर दुसऱ्या शेळीला जंगलात पळवून नेले. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे चुरमुरा व परिसरातील गावांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
चुरमुरा गावासह किटाळी, डोंगरसावंगी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगतात. यापूर्वी जंगलात चराईसाठी गेलेल्या अनेक गुरांना बिबट्याने ठार करुन आपली शिकार साधली आहे.
मात्र शुक्रवारी बिबट्याने चक्क गावात प्रवेश करून खुशाल पांडुरंग मंगरे यांच्या मालकीच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर झडप घातली. यामध्ये गोठ्यातील तिन्ही शेळ्या ठार मारल्या. त्यापैकी एका शेळीवर बिबट्यानेगोठ्यातच ताव मारला.
यावरून बिबट्या बराच वेळ गोठ्यात थांबला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. एका शेळीला गोठ्यातच ठेवून दुसऱ्या शेळीला बिबट्याने नदीच्या दिशेने पळवून नेले. शनिवारी सकाळी शेळी मालक खुशाल मंगरे गोठ्यात गेल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली.
सदर घटनेची माहिती त्यांनी पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला दिली. क्षेत्र साहाय्यक सचिन धात्रक, वनरक्षक एस.जी. लांबकाते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असल्याचे समजते.