प्राणघातक हल्ला केलेल्या जातीवादी गावगुंडावर कार्यवाही ची मागणी : लोणी खुर्द येथील घटना लोकस्वराज्य आंदोलन च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

631

जिवती : लोणी खुर्द तालुका रिसोड जिल्हा वाशीम येथे जातीयवादी गावगुंडांनी लोणी खुर्द गावात क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे फोटो आणि त्यांच्या नावाने बोर्ड का लावले ? यावरून लाईट बंद करून मातंग समाजाच्या लहान थोर वृद्ध व्यक्ती व महिला यांना कुऱ्हाड, काठी, तलवार, दगड गोटे, लोखंडी रॉडने अमानुषपणे प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक २०/११/२०२१ रोजी अंदाजे ०८:०० वाजताच्या दरम्यान घडली.

पुरोगामी महाराष्ट्राला थोर महापुरुष व संत परंपरेच्या विचारधारेची भूमी म्हणून ओळख आहे. त्यांच्या अतुलनीय योगदानाने भारत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व परिवर्तन व्यवस्थेसाठी आपले अमूल्य आयुष्य चंदनाप्रमाणे अशा महापुरुषांना व त्यांच्या विचारधारेचा तीव्र विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसाच प्रकार क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे फोटो आणि त्यांच्या नावाने बोर्ड का लावले ? या कारणावरून लोणी खुर्द येथील घटना घडून आणलेल्या गावातील जातीवादी गावगुंडांनी समस्त पुरोगामी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांचा फार मोठा अपमान केलेला आहे.

हे कृत्य केलेल्या जातीवादी दोषी गावगुंडावर कडक कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्रभर लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार जिवती यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.

निवेदन देताना शाहीर संभाजी ढगे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष, प्रबोधन आघाडी, शिलवंत गायकवाड, युवा आघाडी, जिल्हाध्यक्ष, जीवन तोगरे, रुग्णसेवक, सामाजिक कार्यकर्ता,जिवती व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.