घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात वर्तन बदल घडवून आणण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा

254

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
दि. 04 : पाणी आणि स्वच्छता हे दोन विषय ग्रामिण जनतेसाठी महत्वाचे आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -2 अंतर्गत जिल्हयातील गावांना हागणदारीमुक्त अधिक दर्जा (ODF PLUS) प्राप्त करुन देण्यासाठी सकारात्मक विचार करुन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी ग्रामस्तरावर करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागात पाणी आणि स्वच्छतेच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरंपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. योगेश कुंभेजकर यांनी केले.
त्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच,सचिव तसेच गट व समुह समनवयक यांनी आपली भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे योग्य ज्ञान असणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करुन लोकसभाग मिळविणे अत्यावश्यक आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, सांडपाण्यासाठी योग्य नियोजन करणे तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात वर्तन बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने कै. आबासाहेब खेडकर सभागृहात दिनांक 28 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत सुरु असलेल्या जिल्हास्तरीय घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या समारोपीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
पाणी आणि स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक श्री. अनिल किटे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उमल चांदेकर, ऑल इंडीया इंस्टीटयूट ऑफ लोकल सेल्फ गव्हरमेंट, विभागीय केंद्र नागपूरचे विभागीय संचालक श्री. जयंत पाठक यावेळी उपस्थीत होते.
पाणी आणि स्वच्छतेच्या कामांचे नियोजन करण्यासाठी गावात बैठक घेवून स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन बाबत दिशा निश्चीत करावी. जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शनची कामे, 10 टक्के लोकवर्गणी, गाव हर घर जल घोषित करण्याची कार्यवाही ईत्यादी विविध विषयांवर त्यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक पाणी आणि स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक श्री. अनिल किटे यांनी करतांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन काळाची गरज असून जिल्हयातील निवड केलेल्या गावांमध्येयोजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी संगीतले.
ऑल इंडीया इंस्टीटयूट ऑफ लोकल सेल्फ गव्हरमेंट ,विभागीय केंद्र नागपूरचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी उपस्थीत प्रशिक्षणार्थ्यांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी सादरीकरणाव्दारे सलग दोन तास मार्गदर्शन केले.ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. उमल चांदेकर यांनी घनकचरा व सांडपाणी विषयक तांत्रिक माहीती दिली.
पंचायत समिती सावनेर, पारशिवनी, भिवापूर व उमरेड मधील ग्रामपंचायतींचे सरपंच, सचिव, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट व समुह समन्वयक तसेच ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंता प्रामुख्याने या वेळी उपस्थित होते.