ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा-प्रमोद बदरखे.. वारा (जहाँगीर) येथे राज्य सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त कलापथक कार्यक्रम..

1133

-रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ नुकताच पुर्ण केला आहे. दोन वर्षाच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरोना संकटाचा यशस्वीपणे सामना करतांना राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या आहे. ग्रामस्थांनी देखील आपल्या कल्याणासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांनी केले.

वारा (जहाँगीर) येथे 9 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात राज्य सरकारच्या दोन वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय वाशिम यांच्यावतीने शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कलापथकाने उपस्थित ग्रामस्थांचे मनोरंजन करुन प्रबोधनातून दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री. बदरखे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुगंधाबाई कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विस्तार अधिकारी श्री. कव्हर, माजी पंचायत समिती सदस्य दादाराव धनकर, दिगांबर खोरणे, ग्रामपंचायत सचिव श्री. बोरचाटे, ग्रामपंचायत सदस्य दादाराव खोलगडे, बाळू शिंदे, कडूजी हंबरे, महादेव लांभाडे, पत्रकार राम धनगर, राम सालवणकर, मुकूंदा धाडवे यांची उपस्थिती होती.

श्री. बदरखे पुढे म्हणाले, शासनाच्या योजना ग्रामपंचायत, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, तलाठी तसेच विविध यंत्रणामार्फत गावपातळीवर पोहोचविण्यात येतात. नागरीकांनी गावपातळीवर विविध योजनांची माहिती जाणून घेऊन योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कलापथक कार्यक्रमाचा उद्देशसुध्दा ग्रामस्थांचे मनोरंजन करुन त्यांना माहिती देणे हा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारने दोन वर्षात राबविलेल्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रास्ताविकातून श्री. खडसे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन वर्षाच्या काळात कोरोना संकटावर यशस्वीपणे मात करीत असतांना विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी शिवभोजन योजना ही त्यापैकी एक असून या योजनेमुळे गोरगरीब आणि गरजूंना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. वाशिम येथे राज्यातील पहिले स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकुल उभारल्या जात आहे. या संकुलामुळे जिल्हयातील शेती विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कलापथकाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या काळातील योजनांची माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी लोकसेवा राष्ट्रीय सांस्कृतिक नाटय मंडळाचे अध्यक्ष प्रमुख कलावंत रतन हाडे व त्यांच्या सहकलावंतांनी उपस्थितांना मनोरंजन करुन महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला वारा (जहॉ.) येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.