“त्या” रस्त्यावर दुचाकी, चालविताना येतोय मौत का कुआ चा अनुभव… रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे होत आहेत अनेक अपघात…

876

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या येल्लापूर ते सावलहिरा या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने जिवती व कोरपना तालुक्यातील येल्लापूर मार्गे तेलंगणा कडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे. सावलहीरा ते येल्लापूर रस्त्याचे जेसीबी ने घाट खोदून रस्ता लेव्हल करण्याचे काम झाले. आता रस्त्यावर खडीकरण टाकून पुढील काम सुरू आहे मात्र येल्लापुर वरून सावलहिरा जाताना कंज्या घाटात रस्त्यावर पूर्ण गिट्टी पसरल्याने दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सदर रस्त्यांनी जिवती व कोरपना वरून येल्लापूर तसेच तेलंगणा मध्ये जाण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरूच असते. त्याच रस्त्यावर कंज्या घाटात व इतर ठिकाणी रस्त्यावर पूर्णतः गिट्टी पसरली आहे त्या ठिकाणी उतार पण आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. पसरलेल्या गिट्टीवर लाल मुरून टाकून त्यावर रोलर फिरवून दुचाकी वाहनधारकांना जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने रस्ता बनवून द्यावा अशी मागणी रस्त्यांनी जाणाऱ्या दुचाकी वाहन धारकासह येल्लापूर, सावलहीरा, खैरगाव, कान्हाळगाव, टांगरा व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
येल्लापूर सावलहीरा रस्त्याने जाताना अनेक एकेरी अपघात झाले आहेत परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. वाहनधारकांना सदर रस्त्यावरून जाताना मौत का कुआं ची अनुभुती येत आहे. रस्त्यावर अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे. तरी संबंधित कंत्राटदार व संबंधित विभाग यांनी लक्ष देऊन दुचाकी वाहनास जाण्यासाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

कोट – येल्लापूर ते सावलहिरा रस्त्यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांना कोरपना व वणी बाजारपेठेत जाण्यासाठी खूप सोयीचे होणार आहे. सदर रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरू असते कंज्या घाटात रस्त्यावर अवास्तव गिट्टी पसरली तेथून प्रवास करताना वाहनारकांचा थरकाप उडत आहे. तिथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सबंधित विभागाने जातीने लक्ष घालून त्वरित रस्त्याची सोय करून होणारी जीवित हानी टाळावी.
– दिपक साबने, दुचाकी वाहनधारक