राज्यस्तरीय वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला संविधानिक मूल्यांचा जागर…

533

नागपूर -भारतीय संविधान ‘आम्ही भारताच्या लोकांनी’ दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. संविधानाची मूलभूत तत्वे प्रत्येक नागरिकांस संस्कारीत करणारी आहेत. संविधानातील मूलभूत गोष्टी या माणसाच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याशी व विकसित अस्तित्वाशी अत्यंत निगडित आहेत.

भारतीय संविधान हे राष्ट्रीय एकात्मता व बंधुतेचे तथा देशाच्या संपन्नतेचे जगातील अत्यंत सुंदर असे राष्ट्रग्रंथ आहे. संविधानाचे विचार ‘मना-मनात’ रुजवीने व ‘घरा-घरात’ पोहोचविणे काळाची नितांत गरज असून यासाठी नागपुरातील ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाने राज्यस्तरीय वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नवचेतनेचा संकल्पपूर्वक हुंकार भरत संविधानिक मूल्यांचा जागर केला.

73व्या संविधान दिनाच्या निमित्ताने ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाने ‘संविधानाला अभिप्रेत सामाजिक न्याय’ या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे तर ‘राष्ट्रीय एकता, एकात्मता व बंधुता’ या थीमवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. वक्तृत्व स्पर्धेत अकोला, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा व नागपूर जिल्ह्यातील एकूण 21 व रांगोळी स्पर्धेत एकूण 33 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

वक्तृत्व स्पर्धेत अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाचे नागसेन अंभोरे (प्रथम पारितोषिक), ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर येथील शायमाना पठाण (द्वितीय पारितोषिक), कोलबा स्वामी विद्यालय धापेवाडा जि. नागपूर येथील सलोनी बांबोडे (तृतीय पारितोषिक) तर रांगोळी स्पर्धेत महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथील प्रियंका राठोड (प्रथम पारितोषिक), मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालय काटोल येथील प्रणिता डाखोळे (द्वितीय पारितोषिक) व रामकृष्ण वाघ महाविद्यालय कोराडी येथील हेमलता हेडाऊ (तृतीय पारितोषिक) यांनी पटकाविला.

वक्तृत्व स्पर्धेचे बाह्यपरीक्षक म्हणून दैनिक बहुजन सौरभ चे मुख्य संपादक एडवोकेट डॉ. सिद्धार्थ कांबळे व परिवर्तनवादी लेखिका प्रा. माधुरी गायधनी दुपटे यांनी तर रांगोळी स्पर्धेचे बाह्यपरीक्षक म्हणून डॉ. सरला शनवारे व प्रा. सारिका पाटील यांनी कामकाज पाहिले. अंतर्गत परीक्षक म्हणून प्रा. दीपरत्न राऊत यांनी कामकाज पाहिले‌.

संविधान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दालनात भारताचे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य यावर आधारित पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाने निर्देशित केलेले ‘पर्यावरणाचे संरक्षण’ या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या जागरासाठी ‘रोपटे-पुष्प प्रदर्शनी’ सुद्धा आयोजित करण्यात आली होती.

समाजकार्य तज्ञ तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. चंदनसिंह रोटेले, उपाध्यक्ष डॉ. केदारसिंह रोटेले व युवा संचालिका काजोल रोटेले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाच्या समान संधी केंद्र व सांस्कृतिक समितीच्या वतीने संविधानिक मूल्य जागरासाठी हे नाविन्यपूर्ण व दिशा-दिग्दर्शक आयोजन करण्यात आले होते.

आयोजनासाठी डॉ. व्यंकटी नागरगोजे, प्रा. शालिनी तोरे, प्रा. रचना धडाडे, ग्रंथपाल कल्पना मुकुंदे, कार्यालय अधीक्षक मंगलप्रसाद रहांगडाले यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा प्रारंभ संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन व संविधान प्रास्ताविका वाचन प्रा. शालिनी तोरे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल कल्पना मुकुंदे यांनी केले‌.