दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे वडीलांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट.. दोन सख्ख्या भावांना अटक…

318

महाळुंगे, पुणे: वडीलांचा खून करून दृश्यम चित्रपटातील कथेप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय बनसोडे (वय 43, रा. निघोजे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुजित बनसोडे (वय 21), अभिजित बनसोडे (वय 18) या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनंजय बनसोडे यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (दि. 16) बनसोडे घरातून निघून गेल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरु केला असता बनसोडे यांची नागपुर येथील महिलेशी फेसबुक सोशल मीडियाद्वारे ओळख होऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. बनसोडे यांच्या विवाहबाह्य प्रमेसंबंधांची माहिती समजल्यानंतर घरात पत्नी आणि मुलांसोबत त्यांचे वाद होऊ लागले.

वडिलांचे प्रेमसंबंध मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे आपली मुले हे आपला घातपात करून जीवे ठार मारतील अशी शंका मयत धनंजय यांना होती. त्यांनी ही शंका त्यांच्या नागपूर येथील प्रेयसीला बोलून दाखवली होती. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपास सुरु केला. सुजित आणि अभिजित दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. नागपुरातील महिलेशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्यामुळे वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दोघा भावांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -1 विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (चाकण विभाग) प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, विनोद जाधव, चेतन मुंडे, युवराज बिराजदार, अमोल बोराटे, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, भाग्यश्री जमदाडे, यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील करत आहेत