आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर… चंद्रपुरातील निवासी डॉक्टर झाले या संपामध्ये सहभागी..

257

चंद्रपूर: राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून संपाची (Strike) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर गेले आहे. दरम्यान आज चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारून राज्यव्यापी आंदोलन सहभाग घेतला आणि यावेळी चंद्रपूर येथील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटना चंद्रपूर अध्यक्ष डॉ. प्रवीण दराडे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, चंद्रपूरचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तर अनेकदा मागणी करून देखील मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आला आहे. तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज राज्यभरातील शासकीय रुग्णालयात निदर्शने करण्यात आले.

 

निवासी डॉक्टरांच्या मागण्या!

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड.

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मिती याचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडला आहे. यामुळे निवासी डॉक्टरांचे भविष्य ताटकळत आहे. बंदपत्रीत सेवेचे थोतांड तरी कशाला?

सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरणे. यामुळे निवासी डॉक्टरांचे व पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार?

शासन निर्णयानुसार 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा.

सध्या महाराष्ट्रातील वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व वरीष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत वरीष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा.

अन्यथा आपत्कालीन सेवा बंद करू

मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. आणि शासन स्तरावरून लवकरात लवकर मागण्या मार्गी लावाव्या. अन्यथा आम्हा निवासी डॉक्टरांना कठीण पावले उचलत आपत्कालीन (emergency) सेवा बंद करावी लागेल,असा इशारा निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आला आहे. तसेच करोनाचा धोका उद्भवत असून देखील शासन आम्हाला संप करण्यास भाग पाडत आहे. तरी आमच्या वरील मागण्या शासन स्तरावरून मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा संपाच्या माध्यमातून सुरू राहील. संपादरम्यान रुग्णसेवा ढासळण्यास पूर्णतः शासन जबाबदार राहील,असेही निवासी डॉक्टर संघटनेकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या संपामध्ये मार्ड संघटना चंद्रपूरचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत मगदूद, महासचिव डॉ. ऋतुजा गांगर्डे महिला प्रतिनिधी डॉ. मंगल पाटील, सचिव डॉ. मेहेक सैनी, मीडिया प्रतिनिधी डॉ. तेजस्विनी चौधरी डॉ. दीप्ती कावेरी, डॉ. सोम्या सुंदरी, डॉ. सोनाली सातपुते, डॉ. शरद बुरुंगडे डॉ. प्राजक्ता लाडे, डॉ. ऋतुजा मुडे, डॉ. नाहीद सय्यद, डॉ. पल्लवी रेड्डी, डॉ. अरविंद अलाम, डॉ. विष्णू एस, डॉ. अरुद्रा प्रशांथी, डॉ. इंद्रजीत कुमार, डॉ. सुमेधा मेहानी, डॉ. प्रियंका तलरेजा, डॉ. मृणाल निखाडे, डॉ. साईकुमाल कोलसानी, डॉ. सौरभ माने, डॉ. नितीन गुप्ता, डॉ. साईशा एन, डॉ. वृषभ जाधव, डॉ. रोहित होरे, डॉ. रंजना बिगम, डॉ. भावेश वानखडे यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला…