असामान्य कर्तृत्वाच्या धनी संध्या ताई सव्वालाखे

169

 

नम्रता आचार्य-ठेमस्कर
जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर महिला काँग्रेस (ग्रामीण)

मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस मध्ये काम करते, मी चंद्रपूर सारख्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाच्या जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष आहे. आणि ही संधी मला दिली आमच्या प्रदेश अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी. अनेकजण म्हणतात चंद्रपूर महिला काँग्रेस चे काम चांगले सुरू आहे त्याचे श्रेय अर्थातच आमच्या मार्गदर्शक  संध्या ताईंना आहे.

वरून नारळ पण आतून मात्र मऊ मलाई असा स्वभाव विशेष आहे आमच्या ताईंचा. ताईंचा आवाज एकदम खणखणीत, एकदम कडक पण जेव्हा ताईंच्या संपर्कात आपण येतो तेव्हा कळत की, ही बाई तर अगदी आपल्या मोठ्या बहिणी सारखे आपल्याला सांभाळून घेते. ताई जेव्हा पासून महिला काँग्रेस च्या अध्यक्ष बनल्या तेव्हापासून महिला काँग्रेस च्या कामाला प्रचंड गती प्राप्त झाली आणि मुख्य म्हणजे शिस्त आली. वरून जरी आम्हाला हे कठीण वाटत असल तरी हे आता लक्षात आले आहे की, ताईंच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे महिला काँग्रेस ला शिस्त प्राप्त झाली आहे. महिला काँग्रेस चा झेंडा असला पाहिजे, लोबो असला पाहिजे, प्रोटोकॉल असला पाहिजे हे सर्व आम्हाला आधी फार किचकट वाटत होतं याची प्रामाणिक कबुली दिली पाहिजे. पण आता लक्षात आले आहे की, ताईंच्या शिस्तीमुळेच आज महिला काँग्रेस ला स्वतःची ओळख निर्माण झाली आहे.
हे आम्हा सर्वा पदाधिकाऱ्यांना मान्य करावेच लागेल आणि याचे श्रेय जाते आमच्या अध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांना.

वयाच्या केवळ अठराव्या वर्षी ताईंचे लग्न झाले पण लग्नानंतर त्यांनी आज गाठलेला प्रवास थक्क करणारा आहे. महत्वाच म्हणजे त्यांनी आपल्या वयक्तिक आयुष्यात खूप मोठा आघात तीन वर्षाआधी झेलला. उन्मळून पडलेली ही बाई लेकराच्या वियोगाने कधी उठून उभी राहील असे कोणालाही वाटले नव्हते. पण निश्चय मोठा होता समाजातील शेवटल्या घटकातील स्त्री पर्यन्त आपण पोचले पाहिजे. केवळ या एकाच विचाराने संध्याताई आज उभ्या आहेत.

अगदी कमी वयात ताई जिल्हापरिषद अध्यक्ष बनल्या त्यांनतर मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही. जिल्हा परिषद सदस्य, महिला काँग्रेस च्या सलग १४ वर्षे अध्यक्ष, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव या सारख्या अनेक पदावर काम केल्यानंतर ताईंना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चे अध्यक्ष पद प्राप्त झाले. कोरोना ची दुसरी लाट सुरू असतांना त्यांचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले. ‘मदतीचा एक घास’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात संध्या ताईंच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस ने राबवला. सगळे हॉटेल, उपहारगृह बंद असतांना महिला काँग्रेस ने घरून डब्बे आणून गरजूंना मोफत भोजन उपलब्ध करून दिले, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला पुराचा खूप मोठा फटका बसला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून ११ ट्रक जीवनावश्यक साहित्य महिला काँग्रेस ने पूरग्रस्त भगत पाठवले होते. शेकडो आंदोलने महिला काँग्रेस ने भाजप सरकार च्या विरोधात केले व आताही सुरू आहे. महिला काँग्रेस ला आवश्यक असलेले ट्रेनिंग सुद्धा पुण्याला ताईंच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते.असे कितीतरी उपक्रम, कार्य, ताईंच्या नेतृवात सुरू आहे. महिला काँग्रेस मध्ये कायम होरपळला गेलेला, विकासापासून वंचित राहिलेला, लोकांच्या तिरस्काराचा विषय राहिलेला तृतियपंथीय समाज सुद्धा आज महिला काँग्रेस चा भाग बनला आहे ते केवळ ताईंच्या मानवतावादी दृष्टीकोनाने. आज महिला काँग्रेस मध्ये अनेक तृतीयपंथी वेगवेगळ्या पदावर काम करत आहे, त्यांच्यामागे ताईंचा भक्कम पाठिंबा आहे.

काम करणाऱ्या महिला अध्यक्षांचे आमच्या ताईंना खूप कौतुक आहे समोर कामासाठी प्रोत्साहन आणि मागे आपल्या अध्यक्षांची पाठराखण. आपल्या अध्यक्षांच्या मागे खंबीरपणे संध्या ताई उभ्या असतात पण त्याच बरोबर त्यांच्या हक्कांसाठी लढतात आणि त्या साठी  वेळ पडली तर कोणाही समोर त्या आपला कणखरपणा दाखवू शकतात. अगदी वयक्तिक बाबींची सुद्धा ताई विचारपूस करतात. महिलांचे दुःख समजून घेतात, योग्य मार्गदर्शन करतात, मुख्य म्हणजे अडचणी समजून घेतात. कामाचा व्याप सतत प्रवास त्यामुळे कधी कधी त्या आपल्या तब्येतीकडे सुद्धा हेळसांड करतात. माझ्या महिलांच्या हक्कांसाठी मी भांडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्या भर सभेत मोठ्या पुढाऱ्यांच्या समोर सुद्धा देऊन टाकतात इतका कणखर पणा त्यांच्यात आहे. आपण लढल पाहिजे,तुम्ही संघर्ष करा अडचण आली तर मी आहे असे ताई नेहमी म्हणतात. म्हणूनच मी लिहिलंय की वरून नारळ पण आत गोड पाणी आणि मलाई अशा त्या आहेत.

राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव महिला काँग्रेस ची खडान खडा माहिती. प्रत्येक अध्यक्ष, प्रत्येक पदाधिकारी यांच्या कामाचा अहवाल ताईंना तोंडपाठ आहे इतक्या त्या आमच्या संघटनेत बेमालूमपणे मिसळून गेल्या आहेत. संध्या ताई महिलांच्या साठी हक्काचा आवाज आहे, न्यायाचा दरवाजा आहे, संघर्षाची मशाल आहे. त्या खरोखरच असामान्य कर्तुत्वाच्या धनी आहेत.

आज ३ एप्रिला संध्या ताईंचा वाढदिवस आहे. आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांच्या वर आन्याय होऊन त्यांची खासदारकी रद्द झाली आहे त्यासाठी ठीक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. पक्ष रस्त्यावर उतरला आहे त्यामुळे मी यावर्षी माझा वाढदिवस साजरा करणार नाही तुम्ही देखील करू नका असे आवाहन ताईंनी केले आहे. माझा वाढदिवस साजरा करण्या ऐवजी लोकशाही वाचवण्यासाठी जो लढा सुरू आहे त्यात सामील व्हा हेच माझ्या साठी वाढदिवसाचे गिफ्ट आहे. असे ताईंनी सांगितले आहे. ताई तुमचे कर्तृत्व मोठे आहे, ही तर फक्त सुरवात आहे तुम्ही तुमच्या कर्तुवाने आणि हिमतीने या पेक्षा मोठ्या यशशिखरावर तुम्ही पोचाल हा विश्वास फक्त मलाच नाही तर तुमच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आहे. ताई आम्हाला तुमचा अभिमान आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई. आपल्या नेत्रदीपक यशाने सगळे जग झगमगाटून निघू दे हीच सदिच्छा..