विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या… नवेगाव मोरे येथील घटना…

433

पोंभुर्णा : ‘हर घर तिरंगा’ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात असतानाच नापिकी आणि कर्जाला कंटाळून नवेगाव मोरे येथील शेतकऱ्याने शनिवारी (दि. १२) रोजी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. मनोज भिवा ढवस (४२), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

घराजवळच असलेल्या शेतात मनोज ढवस हे फवारणीचे काम करीत होते. फवारणी करताना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कीटकनाशक औषध प्राषण केले. कुटुंबीयांना माहिती होताच तातडीने नवेगाव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला रेफर करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री ११:३० वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी त्यांच्यावर दीड लाखाहून अधिकचे बँकेचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करणे, शेतकऱ्यांना योजना राबवून आर्थिक संपन्न करणे गरजेचे आहे.