दोन पेटलेल्या चितेकडे पाहून गावकऱ्यांना अश्रू झाले अनावर ! धोपटाळा येथे शोककळा एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यूने झाला घात

501

राजुरा : मृत्यू आयुष्यातले अंतिम सत्य आहे.आजपर्यंत मृत्यू कुणालाच नाकारता आला नाही. काळ बनून आलेल्या भरधाव ट्रकने रविवारी रात्री ८.०० वाजताच्या सुमारास दुचाकीला चिरडले.झालेल्या या अपघातात धोपटाळा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा हकनाक बळी गेला.तर दुसऱ्या घटनेत रामपूर येथील दोन जण गंभीर जखमी झाले.तिघांच्या मृत्यूने गावावरच शोककळा पसरली.त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या वेळी पेटलेल्या दोन चितेकडे पाहून गावकऱ्यांनी हंबरडा फोडला.त्यामुळे अनेकांचे डोळे अक्षरशः पाणावले.

राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथील श्री गुरुदेव नगर येथील रहिवासी निलेश वैद्य (३२) रुपाली निलेश वैद्य (२६ ) व मधू निलेश वैद्य (वय_३ वर्ष) यांचा ट्रक व दुचाकी अपघातात मृत्यू झाला.सकाळी हसत,खेळत आनंदी असणारे कुटुंब अचानक कायमचे निघून गेले.पंचक्रोशीत अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. निधनाची वार्ता गावात धडकताच स्मशान शांतता पसरली. तिघांचेही शव पाहून अनेकांनी एकच हंबरडा फोडला. उतार वयात आपल्या भावासोबत आईवडिलांचा आधार होणारे निलेश वैद्य यांचे कुटुंब कायमचे नजरेआड झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले.निलेश वैद्य राजुरा येथील बळीराजा नागरी सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते कामानिमित्त पत्नी रुपाली व तीन वर्षाच्या चिमुकली मधूसह बाहेरगावी गेले होते.काम आटोपून रात्री गावाकडे परत येत असताना गावापासून १ किमी.अंतरावर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला चिरडले.यात निलेश वैद्य ,पत्नी रुपाली वैद्य व तीन वर्षाच्या चिमुकलीचा हकनाक बळी गेला.
सकाळी घरून आनंदात निघालेले कुटुंब अपघाती निधनाने क्षणार्धात संपले. आपण एकाच वेळेस तिघेही जगाचा निरोप घेणार असा विचारही कधी त्यांच्या मनात शिवला नसावा ? मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.समोरून काळ बनून आलेल्या ट्रकने दुचाकीला गावापासून १ किमी अंतरावर असतांनाच जबर धडक दिली. यात दुचाकीचा चेंदामेंदा होऊन निलेश वैद्य यांच्यासह पत्नी व तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. पाहता पाहता अख्खे कुटुंबच अपघातात संपले.
नियतीने एवढा जबरदस्त आघात वैद्य कुटुंबियांवर केला की त्यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. अपघाती निधनाने असे अकाली जाणे गावकऱ्यांच्या मनाला चटका लावुन गेले. शांत ,मनमिळावू स्वभावाच्या निलेश वैद्य, यांच्या पत्नी रुपाली व चिमुकलीने कायमचा जगाचा निरोप घेतला.सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचेवर राजुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या तिघांच्या पेटलेल्या चितेकडे पाहून गावकऱ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले.अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.यावेळी गावकरी,नातेवाईकांना हुंदके आवरता आले नाही.