दिवसेंदिवस आपल्या सभोवतालची हवा विषारी होत चालली आहे. जगातील अनेक यंत्रणांनी प्रयत्न करुनही हवेचे प्रदूषण रोखण्यात यश आले नाही. दरम्यान, एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्याने भारतीय शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.अभ्यासानुसार, वायू प्रदूषणामुळेभारतात दरवर्षी 2.18 मिलियन मृत्यू होतात.
अभ्यास काय सांगतो?
The BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 2.18 दशलक्ष मृत्यू होत आहेत, जे चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रदूषणाच्या या कारणांमध्ये जवळपास सर्व बाह्य स्रोतांचा समावेश होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 5.1 मिलियन अतिरिक्त मृत्यू होतात. या अभ्यासासाठी नवीन मॉडेल वापरण्यात आले.
आकडे भितीदायक
संशोधकांचा असा अंदाज आहे की, 2019 मध्ये जगभरातील एकूण अंदाजे 8.3 मिलियन मृत्यूपैकी 61 टक्के मृत्यू सर्व स्त्रोतांकडून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. हा आकडा भितीदायक आहे, कारण हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. जीवाश्म इंधनामुळे होणारे हे प्रदूषण अक्षय ऊर्जेने बदलले जाऊ शकते.
मृत्यू कसे होतात?
संशोधकांना असे आढळून आले की, सुमारे 52 टक्के मृत्यू इस्केमिक हृदयरोग, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि मधुमेह यासारख्या सामान्य परिस्थितींशी संबंधित आहेत. तसेच, सुमारे 20 टक्के मृत्यू प्रकरणे उच्च रक्तदाब, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांशी संबंधित आहेत.
मृत्यू टाळता येतील का?
संशोधकांचा असा विश्वास आहे की जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले देश त्यांचा वापर टाळून दरवर्षी सुमारे 4.6 लाख म्हणजेच 0.46 दशलक्ष मृत्यू टाळू शकतात. यामध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेली COP28 हवामान बदल चर्चा जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या दिशेने बर्याच प्रमाणात प्रभावी ठरू शकते. असे मार्ग शोधले जात आहेत जेणेकरून जीवाश्म इंधन कमीत कमी वापरला जाईल.