गडचांदूर: महाराष्ट्र वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ संतांचे विचार व आचार यामुळेच सामाजिक एकता टिकून राहिल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. डॉ. पांडुरंग सावंत यांनी व्यक्त केले. प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर द्वारा आयोजित पाच दिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत ‘नैतिक मूल्ये व संताचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते़. पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील संतांनी कधीही मी असा भाव न धरल्याने ते मोठे कार्य करू शकले़. असे त्यांनी स्पष्ट केले.सदर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून अरविंद मुसने सर उपस्थित होते. तर मा. रमेश राठोड सर, प्राचार्य नानेश्वर धोटे, डॉ. प्रशांत सरकार, प्रा. पल्लवी एकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी समाजातअनेक क्षेत्रांमधील आजही संतांसारखी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याने या क्षेत्राचा व संस्थांचा विकास होतो आहे़ समाजाचे संस्थांकरण हे महत्त्वाचे कार्य प्रारंभी संतांनीच केले़. असे मार्गदर्शन पर भाषणातून प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषानातून अरविंद मुसने सरांनी धर्म, वंश जात यामध्ये भेदभाव केला जाऊ नये यासाठी संत आणि संस्था यांचे कार्य मोलाचे होते़ राज्यातील अनेक चळवळी या संतांशी निगडित असून समतेची चळवळ ही महात्मा फुले यांच्याशी तर प्रार्थना समाज ही न्या. रानडे यांची चळवळ भागवत परंपरेशी तर शाहू महाराजांच्या चळवळीचा प्रवास पुन्हा समतेकडे जातो़ महाराष्ट्राच्या विकासासाठी आजही या चळवळींचे कार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प. डॉ. पांडुरंग सावंत सरांना गोंडवाना विद्यापिठा तर्फे आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत सरकार यांनी केले. संचालन रुपाली टेकाम हिने तर आभार प्रा. एकता गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा उघाडे मॅडम, कुंजन शेंडे मॅडम, प्रतीक मून, गजानन भारती व महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी सहकार्य केले.