गडचांदुर: स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रात दहा लक्ष विध्यार्थी आपले नशीब विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अजमावत असतात. ग्रामीण भागातील विध्यार्थी हा गुणवत्ता असूनही उचित मार्गदर्शना अभावी या स्पर्धेत मागे पडतो हे आता लपून राहिले नाही. स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व संधी तसेच बदलत जाणारा अभ्यासक्रम हे विध्यार्थ्यांना समजून घेणे आवश्यक असून स्पर्धा परीक्षा हे आव्हान नसून एक स्किल आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत सरकार यांनी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर द्वारे आयोजित पाच दिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात केले. पुढे बोलताना स्पर्धा परीक्षा हे आव्हान पेलायचे असेल तर योग्य मार्गदर्शन, अचूक तयारी व त्याला कष्टाची जोड या शिवाय पर्याय नाही.असे मार्गदर्शन त्यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने’ याविषयावर केले. समरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयचे प्रचार्य नानेश्वर धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एकता गेडाम, प्रा. पल्लवी एकरे, मा.प्रतीक मून उपास्थित होते. प्रा. एकता गेडाम यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. त्याशिवाय यश मिळत नाही.कोणत्याही एका विषयावर किंवा क्षेत्रावर भर न देता सर्वसामावेशक विचार केला पाहिजे असे विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमात सातत्य, सराव, चिंतन, मनन आवश्यक आहे.बदलत्या काळानुसार स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत असून त्या बदलांना सामोरे जाऊन तयारी करायला हवी.असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जाधव याने तर आभार आकांक्षा लसंते हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन भारती, रवींद्र पवार, आदित्य थेरे, रोशन राठोड, गणेश साळुंखे यांनी सहकार्य केले.