गडचांदूर-प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी या महापुरुषांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी आपल्या मनोगतात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ४९ वर्षाच्या कालावधीत त्यांनी दीड दिवस शाळेत जाऊन कादंबरी, पोवाडे, कवी लेखन, कविता संग्रह ,लघु कथा, पटनाट्य आदी साहित्य समाजाच्या उत्थानासाठी प्रसिद्ध केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. डॉ. बाबासाहेबांनी जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव या म्हणी प्रमाणे समाजावर शिक्षणाचे घाव घालून त्यांना सुशिक्षित करण्याचे सांगितले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतावादी ठरते असे स्पष्ट केले. दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारविरोधात देशवासियांना एकजूट करण्याचे, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरीत करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. स्वराज्य हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, हा विचार त्यांनी दिला. भारतीय स्वातंत्रलढ्याची आग धगधगती राहील याची काळजी घेतली.
त्यासाठी लोकचळवळ उभारली. त्यामुळे लोकमान्य टिळकाचे कार्य युवकांना प्रेरणादायी ठरते असे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. अरविंद मुसने यांनी व्यक्त केले. डॉ. प्रशांत सरकार यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृतीशील साहित्यिक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. आपल्या लेखणी, शाहिरीवाणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राचा, गोवामुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. तर लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याला, सुराज्यात परावर्तित करण्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य नानेश्वर धोटे, मा. अरविंद मुसने सर, प्रा. पल्लवी एकरे, प्रा. डॉ. प्रशांत सरकार, प्रा. एकता गेडाम उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. पल्लवी एकरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा चिंचोलकर हिने तर आभार मयुरी कोल्हे हिने मानले.