अठरावी निवडणूक आणि मतदाराचे वर्तन : एक विश्लेषण

226

 

निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे लोक त्यांचे राजकीय मत व्यक्त करू शकतात. राजकीय नेता निवडण्यासाठी ते सार्वजनिक मतदानाद्वारे हे मत व्यक्त करतात . शिवाय, या राजकीय नेत्याकडे अधिकार आणि जबाबदारी असते . सर्वात लक्षणीय, निवडणूक ही एक औपचारिक गट निर्णय प्रक्रिया आहे. तसेच, निवडणूक हा लोकशाहीचा निश्चितच महत्त्वाचा स्तंभ आहे. व मताधिकार हा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग आहे . त्यामुळे सर्वात लक्षात घेण्याजोगा, मताधिकार म्हणजे निवडणुकीत मतदान करण्याच्या अधिकाराचा संदर्भ. कोणाला मत द्यावे हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे नामांकन हे देखील निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

_निवडणूक प्रणाली_

(१) देशात मुक्त व न्याय्य निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी घटनेमध्ये (कलम ३२४) स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. या आयोगाला संसद, राज्य विधिमंडळे, राष्ट्रपतिपद आणि उपराष्ट्रपतिपदा च्या निवडणुका घेण्याचा, पर्यवेक्षण करण्याचा व आदेश देण्याचा अधिकार आहे.

(२) संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकांच्या प्रत्येक मतदारसंघाच्या भागासाठी एकच साधारण मतदार यादी असेल. त्यामुळे देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरलेली जातीय प्रतिनिधित्व आणि स्वतंत्र मतदारसंघ पद्धती रद्द करण्यात आली आहे.

(३) केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा यांपैकी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत समावेश करण्यापासून रोखता येणार नाही. तसेच केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा यांपैकी कोणत्याही कारणासाठी कोणतीही व्यक्ती विशेष मतदार यादीत समावेश करण्याची मागणी करू शकत नाही. यामुळे मतदानाच्या अधिकाराबाबत घटनेने समानतेचे तत्त्व अवलंबिले आहे.

(४) लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वावर घेतल्या जातील. त्यामुळे अनिवासी, असंतुलित मनःस्थिती, गुन्हे, भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृत्ये यासाठी घटनेतील किंवा योग्य त्या विधिमंडळाने (संसद किंवा राज्य विधिमंडळ) केलेल्या कायद्यातील तरतुदींनुसार अपात्र ठरविलेल्या व्यक्ती सोडून भारताचा नागरिक असलेल्या व वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या’ प्रत्येक व्यक्तीस मत देण्याचा अधिकार आहे.’

(५) मतदार याद्या बनविणे, मतदार संघाचे परिसीमन किंवा त्यांची योग्य व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींसंबंधी तसेच संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकांबाबत सर्व बाबींसंबंधी संसद तरतुदी करू शकते.

मतदाराचे वर्तन निश्चित करणारे घटक
भारतीय समाजाचे स्वरूप व घडण अतिशय वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे भारतातील मतदार वर्तनावर किंवा मतदान पद्धतीवर विविध घटकांचा प्रभाव पडतो. या निरनिराळ्या घटकांचे दोन मुख्य भाग पडतात सामाजिक- आर्थिक घटक आणि राजकीय घटक आहेत

(१) जात: जात हा मतदारांच्या वर्तनावर किंवा मतदान पद्धतीवर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे. जातीचे राजकारण आणि राजकारणात जातीयता ही भारतीय राजकारणाची खास वैशिष्ट्ये आहेत. “भारतीय राजकारण जातीय आहे आणि जातीचे राजकारण झाले आहे” असे दिसून येते निवडणुकीचे डावपेच ठरविताना राजकीय पक्ष जात हा घटक विचारात घेतात.
“स्थानिक पातळीवर, अंतर्गत भागात जातीय ऐक्य हा मतदान पद्धतीचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. मतदार संघातील मोठ्या व महत्त्वाच्या जाती त्यांच्या जातीतील मान्यवर सदस्याला तरी मत देतात किंवा त्यांच्या जातीचे सदस्य ज्या राजकीय पक्षाशी संबंधित/संलग्न असतील त्या पक्षाला मत देतात. मात्र आंतरजातीय युती असलेले स्थानिक गट आणि राज्यस्तरीय गटांनी एकत्र येणे हा सुद्धा मतदान पद्धतीवर प्रभाव टाकणारा महत्वाचा घटक दिसून येते

(२) धर्म : धर्म हा मतदान पद्धतीवर प्रभाव पाडणारा अजून एक महत्वाचा घटक आहे. राजकीय पंक्ष सांप्रदायिकः प्रचार करतात आणि मतदारांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेतात. विविध सांप्रदायिक पक्षांमुळे धर्माचे राजकारण वाढले आहे, जरी भारत निधर्मी देश असला तरी निवडणुकीच्या राजकारणात कोणताही राजकीय पक्ष धर्माच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करीत नसल्याचे दिसते

(३) भाषा : भाषा हा सुद्धा लोकांच्या मतदान पद्धतीवर किंवा मतदार वर्तनावर प्रभाव पाडणारा एक घटक आहे. निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष लोकांच्या भाषिक भावना चेतवितात आणि त्यांचे निर्णय प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. १९५६ व त्या नंतर झालेली भाषावार प्रांतरचना यातून भारतीय राजकारणातील भाषा या घटकाचे महत्त्व स्पष्टपणे दिसून येते.

(४) प्रदेश: प्रादेशिकवाद व उपप्रादेशिकवाद याची मतदान पद्धतीमध्ये महत्त्वाची भूमिका असते. उपराष्ट्र‌वादाच्या अशा संकुचित दृष्टिकोनामुळे विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष उदयाला आले व त्यांचे स्थान पक्के झाले. हे क्षेत्रीय पक्ष मतदारांच्या प्रादेशिक ओळखीस व प्रादेशिक भावनांना आवाहन करतात. कधीकधी फुटीरतावादी पक्ष निवडणुकीवर बहिष्कार घालण्यास सांगतात.

(५) व्यक्तिमत्त्व : पक्षनेत्याच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची’ मतदान पद्धतीमध्ये महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांच्या प्रभावाचा त्यांच्या पक्षांना लक्षणीय फायदा झालेला व त्यांच्या प्रभावामुळे लोकांनी त्यांच्या पक्षास मोठ्या प्रमाणावर मते दिल्याचे दिसते . राज्य पातळीवरसुद्धा प्रादेशिक पक्षनेत्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा निवडणुकीत त्यांच्या पक्षांना लक्षणीय लाभ झालेला दिसतो.

(६) धन : मतदान पद्धती विशद करताना ‘पैसा’ या घटकाची भूमिका दुर्लक्षून चालणार नाही. निवडणूक खर्चावर मर्यादा घातली असली तरी निवडणुकीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मताच्या बदल्यात लोक पैसे, दारू किंवा वस्तू यांची अपेक्षा करतात. म्हणजेच पैशांच्या मोबदल्यात मुक्तपणे मते दिली जातात. मात्र केवळ सामान्य परिस्थितीत पैशाचा मतदारांच्या निर्णयावर प्रभाव पडू शकतो.
जेव्हा मतदारांमध्ये स्पष्टपणे एकाच दिशेने किंवा एका राष्ट्रीय पक्षाकडे व त्याच्या नेत्याकडे कल बनू लागतो तिला लाट असैलेली निवडणूक म्हणता येईल. ही अशी लाट येणे एखाद्या मुद्द्यावर किंवा मुद्द्यांच्या संचावर आधारित असते आणि स्थानिक गणिते आणि युती यांच्या पलीकडे जाऊन जसजसा खेड्या-खेड्यात व टपरीटपरीवर या लाटेचा प्रसार होत जातो तसेतसे विशिष्ट बांधिलकी नसलेले व निर्णय न घेतलेले बहुतेक मतदार त्याच दिशेने जाऊ लागल्याचे दिसते
(७) सत्तारूढ पक्षाने केलेले काम: निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतो. यामध्ये मतदारांना कामाची आश्वासने दिलेली असतात. मतदार सत्तारूढ पक्षाचे कार्य त्यांच्या जाहीरन्याम्याशी पडताळून पाहतात. सन १९७७ मध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या पराभवावरून आणि १९८० मध्ये झालेल्या जनता पक्षाच्या पराभवावरून असे दिसून येते की सत्तारूढ पक्षाने केलेल्या कामाचा (किंवा त्यांच्या अपयशाचा) मतदार वर्तनावर परिणाम होतो. सत्तारूढ पक्षाच्या कामाविषयी मतदार समाधानी नसल्यास सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनमत तयार होते. हा घटक मतदार वर्तनावर प्रभाव टाकतो.

(८) पक्षनिष्ठा: राजकीय पक्षाशी वैयक्तिक व भावनिक संबंध हा मतदार वर्तनावर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक असतो. जे लोक विशिष्ट पक्षाशी संबंधित असतात ते पक्षाने कार्य केले असो वा नसो त्याच पक्षाला मत देतात. सन १९५० व १९६० च्या दशकात पक्षनिष्ठा खूप मजबूत होती. परंतु, १९७० च्या दशकापासून पक्षनिष्ठा असलेल्या लोकांच्या संख्येत घट झालेली दिसून येते.

(९) विचारधारा : राजकीय पक्षाची राजकीय विचारधारा या घटकाचा मतदारांच्या निर्णयावर प्रभाव पडतो. समाजातील काही लोकांचा साम्यवाद, भांडवलशाही, लोकशाही, निधर्मीवाद, देशभक्ती, विकेंद्रीकरण इत्यादी अशा विचारधारांशी बांधिलकी असते. असे लोक सामान्यतः त्यांच्या विचारधारा असणाऱ्या पक्षांच्या उमेदवारीला पाठिंबा देतांना दिसते.

सारांश
निवडणूक हे राजकीय स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. सर्वात लक्षात घेण्याजोगे, हे एक साधन आहे जे सामान्य लोकांच्या हातात अधिकार ठेवते. त्याशिवाय लोकशाही नक्कीच कार्यान्वित होईल. लोकांनी निवडणुकीचे महत्त्व ओळखून मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडावे.

प्रा. हितेश एम. चरडे
(सहाय्यक प्राध्यापक)
फुले – आंबेडकर कॉलेज ऑफ़ सोशल वर्क, गडचिरोली