वरोरा: महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे “खेळ सर्वांकरिता, सुदृढ समाजाच्या निर्मितीकरिता” हा उद्देश पुढे ठेऊन प्रथमच वरिष्ठ गटाकरिता ३५ वर्षावरील पुरुषांच्या विदर्भयस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ७ ते ९ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ मृणाल काळे, प्राचार्य, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, डॉ विवेक तेला, उपप्राचार्या राधा सवाने, प्रा. तानाजी बायस्कर आदी मान्यवर व प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी ‘खेळ आणि खेळाडूवृत्ती’ याबाबत भाष्य केले. याप्रसंगी सर्व पाहुण्यांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले.
या स्पर्धेचे सर्व सामने लीग पद्धतीने खेळविण्यात आले. स्पर्धेचा अंतिम सामना एपीएमसी क्रिकेट क्लब, वणी विरुद्ध टायगर ११ वरोरा या दोन संघात दि.९ डिसेंबर २०२४ ला घेण्यात आला. या अतितटीच्या सामन्यामध्ये एपीएमसी क्रिकेट क्लब वणी विजेता ठरला, विजेता संघाला १०००० रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आला. तसेच उपविजेता टायगर ११ वरोरा संघाला ५०००रु रोख व चषक उपप्राचार्य राधा सावाने यांच्या हस्ते देण्यात आला. मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज अरविंद आवारी ,उत्कृष्ट गोलंदाज सचिन वैद्य यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत ३५ वर्षावरील पुरुषांच्या एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकार चट्टे व आनंद निकेतन महाविद्यालयाच्या सर्व खेळाडुंनी केले.