पोंभूर्णा :- पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या घोसरी उपक्षेत्रातील पिपरी देशपांडे,देवाडा बुज, जुनगाव या गावातील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्याचे सत्र सुरू होते यात वाघाच्या हल्ल्यात अनेक लोकं जखमी झाले होते.अनेक पाळीव प्राणीही वाघाच्या हल्ल्यात ठार झाले होते.एकामागून एक झालेल्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली होती.नागरिकांचा व शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून वनविभागाच्या वतीने वाघीनीला जेरबंद करण्यासाठी लाईव्ह कॅमेरे,ट्रप कॅमेरे, रॅपिड रिस्पॉन्स युनिट,व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर होते.तीन दिवसापासून वाघिणीच्या हालचालींवर लक्ष होते.अखेर ती हल्लेखोर वाघीन मंगळवार दि.१७ डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान वनविभागाच्या जाळ्यात अडकली.हल्लेखोर वाघीण जाळ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत घोसरी उपक्षेत्रातील काही गावाजवळ वाघाचा वावर आहे.वर्षाच्या शेवटच्या महिन्यात वाघाचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले होते.आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात दोन वेगवेगळ्या गावात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.सध्या या भागात कापूस वेचणी व धान मळणीचा हंगाम सुरू आहे.मात्र वाघाच्या भीतीने शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कापूस वेचणीचे कामं बंद ठेवले होते.त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली होती.त्यामुळे वाघाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाची टिम ॲक्शनमोडवर आली होती.घोसरी उपक्षेत्रातील वाघाचे वावर असलेल्या गावात ३५ कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. बोरघाट जंगलालगत व शेतशिवारात ३ लाईव्ह कॅमेरे,१७ ट्रप कॅमेरे लावण्यात आले आहे.तर पिपरी देशपांडे, ठाणेवासना माल परिसरात १५ ट्रप कॅमेरे लावण्यात आले होते.तीन दिवसांपासून माॅनीटरींगसाठी रॅपीड रिस्पॉन्स युनिट लक्ष देऊन होते.यासोबतच वाघाचे वावर असलेल्या गावात सतर्कतेसाठी वनकर्मचाऱ्यांकडून गस्त घातल्या जात होती .यासोबतच काही शेतकऱ्यांना कापूस वेचणी साठी संरक्षण देण्यासाठी वनकर्मचारी कार्यरत होते.अखेर वनविभागाच्या प्रयत्नाने मंगळवारला हल्लेखोर वाघाचा शोध घेऊन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.तर नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.