ब्रह्मपुरी ः मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. त्यानंतर कंटेनर अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. या विचित्र अपघातात नऊ जण जखमी झाले. अपघाताची ही घटना ब्रह्मपुरी- आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील नीलज(पाचगाव) गावाजवळ शनिवार (ता. २१) रात्रीच्या सुमारास घडली. वृत्तलिहेपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाही. त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी तालुक्यातील नीलज(पाचगाव) येथे एका कार्यक्रमासाठी डीजे आणण्यात आला. डीजे हा ट्रॅक्टरमध्ये होता. तो ट्रॅक्टर चालकाने ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील नीलज(पाचगाव) गावाजवळील रस्त्याच्या कडेला उभा केला होता. याचदरम्यान आरमोरीकडून ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या कंटेनरने डिजेच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरच्या ट्रॅालीत असलेले आणि चालक असे एकूण सहा जण जखमी झाले. ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला. कंटेनरने ब्रह्मपुरीकडून आरमोरीच्या दिशेने जाणाऱ्या फोर्ड कंपनीच्या एम.एच. ३३ ए ५३०५ या क्रमांकाच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार चक्काचूर झाली. कारमध्ये बसलेले तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी जखमींना गडचिरोली येथे उपचारासाठी पाठवले. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद बानबले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज खडसे, पोलिस उपनिरीक्षक रेखलाल गौतम हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली. घटनेतील जखमींची नावे कळू शकली नाही. पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.