राजुरा ः रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने धडक दिली. या अपघातात भावंड ठार झाले. मृतांत भाऊराव पांडुरंग सातपुते (वय ५२ रा. गडचांदूर), देवराव रामाजी सातपुते (वय ४५) यांचा समावेश आहे. अपघाताची ही घटना गडचांदुर- राजुरा मार्गावर असलेल्या पांढरपौनी गावाजवळ रविवार (ता. २२) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
मृत भाऊराव सातपुते हे माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत होते. देवराव सातपुते हे जिल्हा परिषदेत चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत होते. रविवारी दुपारच्या सुमारास दोघेही चुलत भाऊ काही कामानिमित्ताने दुचाकीने बाखर्डी या गावात आले होते. तेथील काम आटोपून दोघेही राजुरा- गडचांदूर मार्गे निघाले. पांढरपौनी या गावाजवळ गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू आहे. या ठिकाणी रस्त्यावर काम सुरू असल्याबाबत माहिती दर्शविणारे फलक नाही. रस्ता बंद केलेला नसल्यामुळे येथून वाहनांची वर्दळ सुरूच असते. सातपुते यांनी याच रस्त्याने आपले वाहन टाकले. याचदरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने धडक दिली. यात भाऊराव पांडुरंग सातपुते (वय ५२), देवराव रामाजी सातपुते (वय ४५) या दोन चुलत भावंडाचा जागीच मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळताच राजुऱ्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, वाहतूक शाखेचे उपपोलिस निरीक्षक तुमसरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.