चंद्रपूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची शनिवारी बदली करून त्यांच्या जागेवर अमरावती विभागातील उपायुक्त संजय पवार यांची नियुक्ती केली होती. सोमवारी नवनियुक्त सीईओ पवार यांनी पदभार स्विकारल्यानंतर मंगळवारी शासनाने १२ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जॉन्सन यांची पुन्हा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. अवघ्या दोन दिवसांत सीईओ जॉन्सन यांची घरवापसी झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांपासून सीईओ विवेक जॉन्सन यांनी नवनवीन योजना राबवून जिल्हा परिषदेचे नाव राज्यात उंचावले आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्याने राज्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चंद्रपूरचे सीईओ विवेक जॉन्सन यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना कुठेही पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यांच्या जागेवर अमरावती विभागातील उपायुक्त (सामान्य) संजय पवार यांची २१ डिसेंबर रोजी चंद्रपूरचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याबाबतची अधिसूचना अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी काढली होती. या अधिसुचनेत भारतीय प्रशासन सेवेत पुढील आदेश होईपर्यंत परीविक्षाधिन नियुक्ती करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी भारतीय प्रशासन सेवेतील १२ अधिकाऱ्यांचे शासनाने बदली आदेश काढले आहे. या आदेशात संजय पवार यांची बदली राज्य कर विभागात सहआयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर अवघ्या दोन दिवसांत विवेक जॉन्सन यांना पुन्हा चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चौकट…
जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक जॉन्सन यांची दोन दिवसांपूर्वी बदली झाल्यानंतर पदस्थापना देण्यात आली नव्हती. मात्र, मुंबईतील चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे सीईओ जॉन्सन यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या व्हॉट्ॲप ग्रुपवर बदली झाल्यानंतर आनंदी असल्याचा मॅसेज टाकला होता. त्यामुळे चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती होणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र, दोन दिवसांतच पुन्हा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून जॉन्सन रूजू होणार आहेत.