शिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त 

504

कारवाई त्वरीत थांबविण्याची  आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांची मागणी

चंद्रपूर/ प्रतिनिधी
जिल्ह्याच्या विविध गावामध्ये वनविभागाने जबरानजोतधारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे आज वनविभागाने ट्रक्टरद्वारे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी सावली तालुक्यातील घोङेवाही, तर ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथेही वनविभागाने कारवाई केली आहे. सदर कारवाई सर्वार्धाने चुकीची असून, अशा सर्व कारवाईंना त्वरीत थांबविण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या राज्य नेत्या ॲङ. पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हाधिका-यांकङे केली आहे.
सध्या सर्वत्र  कोविङची महामारी सुरू असून, लोकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीमध्ये जे जुने जबरानजोतधारक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले तर ग्रामीण भागात प्रचंड असंतोष आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाकारता येत नाही. मागील तीन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात सहा लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. जबरानजोतधारकांची शेती या आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये शेती काढून घेतल्यानंतर जबरानजोत शेतक-यांनी आत्महत्या केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील.
चंद्रपूर जिल्ह्यात माॅन्सून सुरू झाला असून, शेतकरी सध्या खरिप हंगामात गुंतलेले आहेत. पावसाळा सुरू झाल्या नंतर कोणत्याही अतिक्रमणाला हात न लावण्याचे आजवरचे धोरण आहे. पावसाळ्याच्या हंगामात जबरानजोतधारकांच्या अतिक्रमणाला काढण्याची कारवाई त्वरित थांबविली पाहिजे. जिल्हा वनाधिकार समितीने शेकडो दावे खारिज केले आहे. यापैकी अनेक दावेदारांनी पुरावे जोडून पुनर्विलोकन अर्ज दाखल केले आहे. सदर अर्ज मागील एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित असून, याबद्दल अंतिम निकाल लागायचा आहे.
कोरोनाने झालेल्या उत्पन्न झालेल्या आर्थिक संकट, माॅन्सून हंगाम, शेतकरी वर्गाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता आपण कृपया वनविभागाला जबरानजोत धारकांवर कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत आणि जबरानजोत धारकांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.