गडचीरोली प्रतिनिधी / सतीश कुसराम
जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्हयातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने आज जिल्हयात भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाला झालेल्या नूकसानाचे पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करुन नागरिकांना आवश्यक मदत देण्यासाठी प्रक्रिया सुरु करावी अशा सूचना दिल्या. त्यांनी आढावा बैठकी आधी कनेरी, पारडी या भागात पूरग्रस्तांची भेट घेतली तसेच पूरस्थितीची पाहणी केली. तसेच पारडी येथील शाळेतील निवारा गृहाला भेट देवून पुरग्रस्तांबरोबर सोयी सुविधांबाबत विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी दिपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पारडी गावचे सरपंच संजय निखारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पुरपरिस्थिती दरम्यान एकनाथ शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. सद्या पूरस्थिती अजून 24 ते 48 तास सक्रिय राहील त्यामुळे सद्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे व त्यांना जीवनावश्यक साहित्य देणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. पूरस्थितीमुळे घरांचे, शेतीचे, जनावरांचे तसेच अन्य प्रकारे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याबाबत तातडीने पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरु करुन आवश्यक मदत द्यावी असे निर्देश त्यांनी अधिकारी वर्गाला दिले. जिल्हयात कोरोना बरोबर नागरिकांना पूरस्थितीलाही सामोरे जावे लागत आहे. प्रशासन या परिस्थितीत चांगल्या प्रकारे परिस्थिती सांभाळून त्यावर मात करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे.
याआधी जिल्हयात दाखल झाल्यानंतर गडचिरोली सिमारेषेवर त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा पुराच्या पाण्याची पाहणी केली. यावेळी गडचिरोली मधील आलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधून पुरस्थितीबाबत चर्चा केली.
शहीद जवान दुशांत नंदेश्वर यांच्या कुटुंबियांची भेट
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थितीची पहाणी केल्यानंतर नुकत्याच कोठी भामरागड येथील शहीद झालेले जवान दुशांत नंदेश्वर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहीद जवानाच्या प्रतिमेस आदरांजली वाहून कुटुंबीयांना दिलासा दिला. यावेळी त्यांनी कुटुंबाशी संवाद साधत असताना शासन आपल्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असे सांगितले.