जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हास्तरावर आदेश निर्गमित केले.
गडचीरोली / सतीश कुसराम
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेवून नागरिकांच्या विनापरवाना प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. पंरतू राज्य शासनाकडून आता नागरिकांना आवश्यक कामांकरीता कोणत्याही प्रकारचे ईपास, इतर परवाने घेण्याची गरज नाही असे सूचित करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हास्तरावर आदेश निर्गमित केले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:हून अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन केले आहे. ते म्हणाले पूर्वीपेक्षा आता जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत अटी शिथिल केल्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्गाची भिती संपली असे समजू नये. प्रवासावरील बंधने रद्द केल्यामुळे आंतरजिल्हा प्रवास मोठया प्रमाणात सुरु होईल. त्यामुळे जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही संसर्गाचा धोका संपलेला नाही. नागरिकांनी व्यक्ती व्यक्ती मधील सुरक्षित अंतर राखून, तोंडाला मास्क वापरुन प्रवास तसेच दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना संसर्ग मोठया प्रमाणात जिल्ह्यात पसरु न देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही नागरिकांना केले आहे. यामध्ये मास्क वापरणे, गर्दी न करणे तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास जवळील आरोग्य केंद्राला कळविणे याचा समावेश आहे. ते म्हणाले नागपूर विभागातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या विश्लेषणातून सर्वांत जास्त मृत्यू हे पुरुषांचे आहेत. 68 टक्के मृत्यू हे 50 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. तसेच 32 टक्के मृत्यू हे 50 वर्षाखालील व्यक्तींचे आहेत. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण 86 टक्के आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांनी कोरोना संसर्गामूळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी जास्त सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.