गडचांदूर
परतीचा पावसाने राजूरा,विरूर क्षेत्राला अक्षरस झोडपून काढले. चार दिवसात हातात येणारे शेतपिके भुईसपाट झालीत.धान पिक कुजले,झाडावरचा कापसाला अंकुर फुटले , सोयाबिन पिकांची तिच अवस्था.मायबाप सरकार मदतीचा हात पुढे करेल या आशेत बळीराजा आहे मात्र अद्याप शासनाकडून नुकसान झालेल्या शेतपिकांची साधी पाहणी झालेली नाही.
राजूरा,विरूर परिसरात मागिल आठवड्यात परतीचा पावसाने झोडपून काढले.वादळी पावसाने शेतपिके उध्वस्त केलीत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस, सोयाबीन, धान पिकांची लागवड होते. दिवाळीपूर्वी सोयाबीन व धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येत असते. सणासुदीच्या दिवसात एक मोठा आधार शेतकऱ्यांना असतो. आयुष्यभर काळ्यामातीत राबून आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी बळीराजा घाम गाळत असतो. नवी आशा, नवे स्वप्न घेऊन संकटाला न जुमानता बळीराजा उमेदीने शेतात राबतो आहे. मात्र यावर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे .शेकडो हेक्टरवरील उभे पीक परतीचा पावसात उद्ध्वस्त झाले .वादळी पावसामुळे सोयाबीन शेतातच अंकुरला आहे. कापूस काळवंडला आहे तर धानाचे पीक जमीनदोस्त झालेले आहे. याबाबत आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे निवेदने देण्यात आलीत. मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झालेत नाहीत. पंचनामे करण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाले नसल्याचे वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या पर्वावर हातातून पिके गेल्याने बळीराजा पूर्ण हतबल झालेला आहे. कर्जाचे डोंगर होण्याची भीती आहे. कुटुंब चालवायचा कसा हा यक्षप्रश्न बळीराजापुढे उभा आहे. अशातच शासनाच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.