वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित! महावितरणच्या नोटिसमुळे ग्राहक चिंतेत…

657

मागील वर्षभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे हाताला न मिळालेले काम, त्याचबरोबर अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांनी जवळजवळ वर्षभर महावितरणचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे वरचेवर थकीत बिल वाढतच आहे. ही थकबाकी न भरल्याने थेट कनेक्‍शन तोडण्याची कारवाई महावितरण करणार आहे. दरम्यान, या कारवाईच्या आदेशामुळे महावितरणच्या ग्राहकांनी मात्र धास्ती घेतली आहे.

गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळित झाले होते. त्यामुळे वीज ग्राहकांची थकबाकी वरचेवर वाढतच गेली. त्यातच विविध राजकीय पक्षांनी या काळातील वीजबिल माफ करण्याची मागणी केली असल्याने वीजबिल माफ होईल, या आशेने वीज ग्राहकांनी मात्र वीजबिले भरलीच नाहीत.

महावितरण कंपनीला मात्र देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागवण्यासाठी आता अडचणी निर्माण झाल्याने व थकबाकीदारांनी थकीत वीजबिले भरावी नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वारंवार आवाहन करूनही ग्राहक वीजबिले भरत नसल्याने महावितरणचे मात्र दिवाळे निघू लागले आहेत.

वस्तुतः कोरोना लॉकडाउनच्या काळात ग्रामीण तसेच शहरी भागात सर्व लोक घरीच होते. काहीही कामधंदा नव्हता, त्यामुळे विजेचा वापरही नेहमीपेक्षा जवळजवळ दुपटीने वाढला होता. या काळात टीव्ही, फॅन, फ्रीज, कूलर, एसी यासह लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल आदी विजेवर चालणाऱ्या वस्तू 24 तास चालू राहिल्या होत्या व त्याचा सर्रास वापर वाढला होता. त्यामुळे नेहमी येणाऱ्या वीजबिलापेक्षा कोरोना लॉकडाउन काळात वीजबिल जास्त येणारच होते, हे मात्र सर्वसामान्यांच्या लक्षात आले नाही. या काळात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता, हेही खरे आहे.