बल्लारपूर : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी, मानोली, बाबापूर, कोलगाव या शेतीशिवारात वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या तीन दिवसात दोन गायीचा फडशा पाडला आहे. या भागात वाघाच्या दहशतीने लोकांनी एकटे शिवारात जाणे बंद केले आहे.
दिनांक 18 फेब्रुवारीला दुपारी सास्ती येथील शेतकरी विनोद चौधरी यांच्या मालकीची गाय सास्ती – मानोली शेतशिवारातील ओढ्याचे जवळ मृतावस्थेत आढळली. वाघाने या गायीचे अर्धे मांस खाऊन टाकले होते. यानंतर आज दिनांक 20 फेब्रुवारीला दुपारी सास्ती वर्कशॉप चे बाजूला, गोवरी टाऊनशिप जवळ सास्ती येथील शेतकरी नितीन शालीक पहानपटे यांची गाय मृतावस्थेत आढळली. या गायीचा काही भाग वाघाने खाल्ल्याचे दिसून आले. या भागात असलेल्या वाघाने आता वन्य प्राण्याऐवजी पाळीव प्राण्यांना भक्ष करणे सुरू केले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. वनविभागाकडे या दोन्ही प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून तेथे सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.