बिग राजकीय ब्रेकिंग! गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा…

583

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुखांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेगाने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मनसुख हिरेन मृत्‍यूप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक झाली. यानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्‍याला १०० कोटी खंडणी वसूली करण्‍याचे आदेश दिले होते, असा दावा करणारे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्राने राज्यात मोठी खळबळ उडाली होती.