चंद्रपूर: चंद्रपुरात Chandrapur कोरोना हाहा:काराच्या काळात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कुठलीही प्रशासकीय मान्यता नसताना शहरात धडाक्यात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरालगत वांढरी गावात खाजगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये हा खेळ सर्रासपणे चालू आहे.
श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालय असे या रुग्णालयाचे नाव आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. विश्वास झाडे या रुग्णालयाचे प्रमुख आहेत. या रुग्णालयाला अद्याप कुठलीही सरकार मान्यता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मान्यता प्रस्ताव सादर केल्यावर पहिल्या निरीक्षण दौऱ्यात शासकीय पथकाला रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यात त्रुटी असल्याचे दिसून आले होते. आणि या पथकाने तसा शेराही दिला होता. मात्र याविषयी ठोस सुधारणा होण्याआधी रुग्णालयाने 25 ऑक्सिजन बेडसाठी रुग्णभरती सुरू केली आहे.
ऑक्सीजनची कोणतीही व्यवस्था नाही आणि परवानगी नसताना हे रुग्णालय कुणाच्या मान्यतेने सुरू झाले ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्याहून संतापजनक गोष्ट म्हणजे या रुग्णालयात मृत्यूची नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. मयताच्या नातेवाईकांनी डॉ. झाडे हे रुग्णालयात फिरकून पाहत सुद्धा नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ या रुग्णालयात होत आहे. प्रशासनाने या रुग्णालयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिक करत आहेत.