वणी(यवतमाळ) : गर्भवती वाघिणीला गुहेत डांबून भाल्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने तिला ठार मारल्याच्या घटनेतील आरोपी असलेल्या बापलेकांना अखेर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बेड्या ठोकल्या. अशोक लेतू आत्राम (२०), लेतू रामा आत्राम (४५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पांढरवाणी या गावातून या दोघांना उचलण्यात आहे. यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी शुक्रवारी रात्री पांढरकवडा पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे, खासदार सुरेश धानोरकर, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप ठाकरे, पांढरकवडाचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेसी, मुकुटबनचे ठाणेदार धर्माजी सोनुने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ऋषी ठाकूर यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचा उल्लेखही डॉ.भुजबळ यांनी यावेळी केला. या कारवाईत एक वाघ नख व वाघिणीचा एक पंजा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी हा पंजा घटनास्थळ परिसरात दडवून ठेवला होता.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून मृत वाघिणीचा एक पंजा व नऊ नखे जप्त करायची आहेत. त्यासाठी पोलिसांची व वन विभागाची चमू रवाना करण्यात आल्याची माहितीही डॉ.भुजबळ यांनी दिली. शिकारीच्या उद्देशानेच वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे डाॅ.भुजबळ यांनी सांगितले.