धक्कादायक: तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर पडली त्याची नजर आणि घडला थरार…

755

मूल (जि. चंद्रपूर):  तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना जानाळा येथील बफर झोन क्षेत्रात मंगळवारी (ता. ४) सकाळी दहा वाजताच्यादरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वनिता वसंत गेडाम (वय २५) असे जखमी महिलेचे नाव आहे.

तेंदूपाने तोडण्याच्या हंगामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.जानाळा येथील चार-पाच महिला तेंदूपाने तोडण्यासाठी जानाळा तलाव परिसरातील वाघलोधी या भागात सकाळी गेल्या होत्या. पाने तोडत असताना तलावाच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या एका वाघिणीच्या बछड्याने वनिता गेडाम यांच्यावर हल्ला चढविला. तिच्या सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्याने बछड्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.

वनिता गेडाम यांच्यापाठीवर, छातीवर तसेच हाताला गंभीर इजा झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आनंदराव कोसरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक उपचारासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात वनिता यांना दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

जानाळा तलाव आणि जानाळा परिसर बफर झोन क्षेत्रात येत असल्याने येथील घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार आहे. तलावाच्या परिसरात एका बछड्यासह या वाघिणीचे वास्तव्य असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही जानाळा गावाला वाघाच्या डरकाळीने दणाणून सोडले होते.