अवैद्य उत्खननामुळे नांदगाव पोडे गावाला धोका- राजु झोडे

489

बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील सर्वे नंबर १६२,१६३,१५७/१,१५७/२ मधील पुरातन पहाड व लोकवस्तीच्या सभोवताल वहिवाटीचा रस्ता खोदकाम करून सदर रस्ता प्रभाकर विठोबा वरभे, संदीप प्रभाकर वरभे यांनी पूर्णपणे बंद केला. सदर जागेजवळ मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असून तेथील नागरिक रस्त्याने ये-जा करतात. मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केल्यामुळे लोक वस्तीला धोका निर्माण झालेला असून सदर खोदकाम करताना कोणाचीही परवानगी जमीन मालकाने घेतलेली नाही. वीस ते पंचवीस फुटापर्यंत अवैध उत्खनन केल्यामुळे पावसाळ्यात तुडुंब पाणी भरण्याची शक्यता असून सध्यास्थितीत तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. त्या परिसरात बरेच नागरिकांना घरकुल मिळाले असून त्या ठिकाणी तीस वर्षापासून नागरिक वस्ती करीत आहे. संदीप वरभे व प्रभाकर वरभे हे भाजपाच्या काही राजकीय लोकांना व प्रशासनाला हाताशी घेऊन मनमानी पद्धतीने अवैध उत्खनन करत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून सदर व्यक्तींच्या जमिनीची व खोदकामाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदनाद्वारे केली.
ग्रामपंचायतीचे व प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैध उत्खनन करून नासधूस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व खोदकाम केलेली जमीन बुजविण्यात यावी अशी मागणी येथील संतप्त गावकऱ्यांनी शासनाकडे केली.मागणी पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.
नांदगाव पोडे येथील गावकर्यांसोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते राजूभाऊ झोडे, संपत कोरडे, महादेव ढोबे, निरज दूधे, सचिन चीवंडे, माधुरी ढोक, भास्कर कांबळे, स्वपनिल सोनट्टके नूतन शेंडे तथा वंचित चे अन्य पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.