कोठारी शिवारात वाघ – बिबट्याचा धुमाकूळ…बिबट्याच्या हल्ल्यात इसम जखमी; तसेच तीन म्हशींसह अनेक जनावरे ठार

511

राकेश कडुकर (प्रतिनिधी)

बल्लारपूर: बल्लारपूर तालुक्यातील कोठारी वनपरिक्षेत्रात कोठारी-बामणी-काटवली शेत शिवारात वाघ-बिबट धुमाकूळ घालत असून पोलीस स्टेशन मागील संजय बाबुराव गुरू यांचा बैल वाघाने ठार केला आहे… मागील महिनाभरात वाघ, बिबट्याने तीन म्हैस व अनेक बैलाचा फडशा पडला असून, बामणीत मनोहर मडावी याचे घरात बिबट्याने प्रवेश करून जखमी केल्याची घटना ताजी आहे. यामुळे कोठारी, बामणी व काटवली परिसरात दहशत पसरली आहे.
कोठारीतील शेत शिवारात सोनेरा, पिपरथडी नाल्याच्या परिसरात वाघाचे वास्तव्य अनेक दिवसांपासून आहे. या वाघाचे अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. कोठारी शेतशिवारालगत जंगल लागून असून यात भरपूर प्रमाणात वाघ, बिबटसह हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. जंगली प्राणी गावाशेजारी पाण्यासाठी भटकत असतात. अशात कोठारी गावालगात वर्धा नदी व नाले लागून आहेत. नाल्याच्या किनाऱ्यावर झाडेझुडपे असून त्यात प्राण्यांना राहण्यासाठी चांगले ठिकाण आहे. नाल्याशेजारी गावकऱ्यांची शेती शेती असून, मशागतीकरिता नियमित जावे लागते. अशात शेतात चरणाऱ्या पाळीव प्राण्यावर वाघाचा हल्ला होत असून, ठार मारल्या जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील तीन महिन्यात तीन
म्हैससह अनेक बैल व गायींचा बळी गेला असून, त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव जनावरांचे वनविभागाकडून पंचनामे करण्यात येतात. मात्र, त्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नाही. वनविभागाने नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोठारी परिसरातील शेत शिवारात वाघाचे दर्शन अनेक शेतकऱ्यांना होत असून शेतकऱ्यांत प्रचंड दहशत पसरली आहे. शेतात काम करताना जीव मुठीत घेऊन व सूर्यास्ताचे आधी घरी परत यावे लागत आहे. शिवारात वाघाचा वावर वाढल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. चार दिवसांपूर्वी कोठारीनजीक बामणी येथे मनोहर मडावी यांच्याघरात बिबटाने प्रवेश करून हल्ला
केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला मात्र, पिंजऱ्यात बिबट्या अडकला नाही. त्यामुळे बामणीत बिबटची दहशत कायम असून, रात्री गावकरी रस्त्यावर येणे बंद केले आहे. शेतातील कामे करण्यास कचरत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान संजय गुरू आपल्या बैलासोबत शेतातून घरी येत असताना वाघाने बैलावर हल्ला करून ठार केले आहे. त्याची दखल वनविभागाने घेतली व पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रकरण वनविभागाकडे पाठविल्याचे सांगितले आहे. मात्र, नुकसान भरपाई वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.