एटापल्ली :- सुरजागड प्रकल्पातील उत्खननाला नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून विरोध केला आहे. गोंडी भाषेत नक्षली पत्रक टाकून सुरजागड प्रकल्पाला सहाय्य करणाऱ्या लोकांना नक्षल्यांनी इशारा देण्यात आला आहे.
सदर पत्रकातून स्थानिक एटापल्ली, आलापल्ली येथील सहाय्य करणाऱ्याचा स्पष्ट नावासह उल्लेख असल्याने हा ईशारा देण्यासाठी प्रयत्न होत आहे का? सदर पत्रकात जिल्हा परिषद सदस्यासह आलापल्ली येथील या प्रकल्पाला साहाय्य करणाऱ्या व प्रसार माध्यमाना मॅनेज करणाऱ्या डॉक्टर आणि एटापल्ली येथील काही व्यापारी, त्रिवेणी कंपनीच्या वतीने काम सांभाळणाऱ्या सेवानिवृत्त सेनेतील अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे लिहिलेल्या या पत्रकातील मजकुरामुळे चर्चेला उधाण आले आहे.
हे नक्षली पत्रक आठ ते दहा दिवसांपूर्वी मंगेर-हेडरी मार्गावर आढळून आले आहे. लाल अक्षरात लिहिल्या गेलेल्या या पत्रकात भाकपा माले माओवादी पिपुल्स वॉर ग्रुप असा उल्लेख आहे. हे पत्रक नक्षल्यांनीच लिहिले की कुणी हेतूपरस्पर खोडसरपणा केला हे पोलीस विभागाच्या चौकशीत निष्पन्न होईलच. मात्र या पत्रकामुळे चर्चेला उधान आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित व तेवढ्याच वादग्रस्त सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे उत्खननाचे काम मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले. मात्र, नक्षलवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध दिसून येत आहे. अशातच सुरजागड लोहखनिज पहाडाच्या परिसरात नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्याने पुन्हा परिसरात खळबळ उडाली आहे.
या पत्रकात लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंपनीला मदत करणाऱ्या लोकांना नक्षलवाद्यांनी पत्रकातून सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात येथे काम करणारे व या प्रकल्पाला मदत करणारे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर येण्याची चिन्हे आहेत.
लॉयड मेटल्स कंपनीच्या नावे या प्रकल्पासाठी लीज मंजूर असून येथील लोहखनिज उत्खननाला ग्रामसभा व नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून हे काम बंद होते. पण, लॉयड मेटल्स कंपनीकडून पुढील उत्खननाचे काम तामिळनाडूतील सेलम येथील त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. लि. कंपनीला मिळाले असून हे काम पुन्हा सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा नक्षलवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध करून ८३ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर एका अपघातानंतर या प्रकल्पाचे काम बंद झाले होते. त्यांनतर त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी ने काम हाती घेतल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेविना उत्खननास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या भागातील ग्रामसभांचा आधीपासूनच या प्रकल्पाला विरोध असतांना स्थानिक विरोध डावलून उत्खननास सुरुवात करण्यात आली आहे.