मातीशी नाळ जुळलेले खेळाडू देशासोबत प्रामाणिक : खासदार बाळू धानोरकर… वरोरा येथे आमदार चषक भव्य खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन

376

चंद्रपूर : आपल्या देशात मातीतील खेळांचा मोठा इतिहास आहे. मातीतील खेळामुळे तरुणांमध्ये नवचैतन्याची निर्मिती होते. एवढेच नव्हे तर याच मातीशी जुळलेले खेळाडू देशासोबत सुद्धा प्रामाणिक असतात असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते वरोरा येथे आमदार चषक भव्य खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन समारंभाच्या वेळी बोलत होते.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस तालुका अध्यक्ष भद्रावती प्रशांत काळे, पंचायत समिती सदस्य बबिताताई कुळमेथे, चिंतामण आत्राम, भद्रावती शहर काँग्रेस अध्यक्ष सुरज गावंडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष वर्षा ठाकरे, शहर अध्यक्ष सरिता सूर, इंटक माजरीचे अध्यक्ष धनंजय गुंडावार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले,गजानन मेश्राम,नगरसेवक राजू महाजन,सुनील कटारीया यांची उपस्थिती होती.

भव्य खुले कबड्डी सामने यात राष्ट्रीय स्तरावरील संघानी भाग घेतला आहे. या कबड्डी सामन्यात विजेत्या संघाला आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले, असून प्रथम पारितोषिक 100001 रु., द्वितीय पारितोषिक 50001 रु. तर तृतीय पारितोषिक 25001 रुपये रोख देण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर इतरही बक्षिसे असून उत्कृष्ठ चढाई साठी 5000 रु. उत्कृष्ठ पकड साठी 5000 रु. उत्कृष्ठ जम्पर साठी 5000 रु. आणि उत्कृष्ठ ऑलराउंडर साठी 5000 रु. रोख रक्कम देण्यात येणार आहे. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकारातून आमदार चषक भव्य खुले कबड्डी सामने घेण्यात येत आहे. आज उदघाटन समारंभानंतर घेण्यात आलेल्या सामन्यात एकावेळी तीन खेळाडूंना बाद केलेल्या तीन खेळाडूंना प्रत्येकी तीन हजार रुपये तर चार खेळाडू बाद केलेल्या खेळाडूला आठ हजार रुपये प्रोत्साहन बक्षीस नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. देशातील चाळीस संघ या सामन्यात सहभागी होत आहे.