जनतेच्या तक्रारींना प्राधान्य द्या – आर. विमला (जिल्हाधिकारी नागपूर)

258

-दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)

नागपूर: जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचा उद्देश नागरिकांच्या समस्या, निवेदन व तक्रारीचे निराकरण करण्याचा आहे. ग्राहकांच्या अधिकाराचे रक्षण करुन त्यांच्या तक्रारींना प्राधान्य देवून तत्काळ निवारण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण पर्रिषदेचे वेबीनारद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अन्नधान्य वितरण अधिकारी भास्कर तायडे, सहायक पुरवठा अधिकारी मृदुला मोरे, सहायक आयुक्त अन्न प्रशासनाचे अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अमित कराड, शिक्षण विस्तार अधिकारी एच.बी. कुमरे, व्ही.पी. बनाफर, एन.पी. जोशी, व्ही. पी. जोशी जिल्हाधिकारी कार्यालयात तर दुरदृष्यप्रणालीद्वारे मो. शाहिद शरिफ व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
सामान्य जनतेस त्रास होईल अशा कोणत्याही प्रकारास प्रतिबंध घाला, टपरीवरील खाद्यपदार्थाची कडक चौकशी करा, खाद्यतेलाचा दर्जा उत्तम राहील यावर अधिक लक्ष ठेवून तपासणीवर भर दया. शिधापत्रिकेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला असून इष्टांक प्रात होताच शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य गटातील लाभ देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव नाहीसा झालेला आहे, अशाही परिस्थितीत वृध्द व वयोवृध्द नागरिकांना घरातच रहावे लागते. त्यामुळे आरोग्यविषयक व्यायाम व योगासाठी नागूपर येथील उद्याने व बगिचे सुरु करण्याच्या सूचना अशासकीय सदस्यांनी केली असता कोरोना नाहीसा झाला नसून कमी झालेला आहे, त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच उद्याने व बगिचे यावरील बंदी उठविण्यात येईल, असे आर. विमला यांनी सांगितले.

यावेळी ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. टपरीवरील खाद्य पदार्थ, सर्व प्रकारच्या मिठाई, बेकरी पदार्थांचे डिटेक्शन, सर्व शाळांमध्ये आरटीईमधील रिक्त जागांची नोटीस बोर्डवर प्रसिध्दी, नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य, स्कुल बसचे अनियंत्रित भाडेवाढ, वीज संबंधित नियम व अटी फलक दर्शनी भागात लावणे, मास्क, सनिटायझर यांचे वेगवेगळे दराबाबत चर्चा करण्यात आली.
मास्कचे दर वेगवेगळे असल्याचे सदस्यांनी सांगितले.

स्कुलबसमध्ये महिला नेमणूक करुन अवाजवी भाडेवाढीबाबत परिवहन समिती समोर प्रकरण ठेवण्याचे सदस्यांनी मान्य केले. विज भरणा केंद्रावर नियम व अटी लावण्यात आल्या असून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे महावितरणच्या प्रतिनिधींना सांगितले. आरटीईबाबत पोर्टलवर माहिती उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत खाद्यतेल रिपॉकरवर 10 धाडी घालून कार्यवाही करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.