उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा

237

-दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)

नागपूर : नव्याने उद्योजक म्हणून पुढे येत आपल्या स्वतःचा एक उद्योग,एक उपक्रम उभारायचे ज्या महिलांचे स्वप्न असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र शासन, अमेरिकन दूतावास आणि नाविन्यपूर्ण योजनांना मूर्त रूप देणाऱ्या एकाच स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत महिलांसाठी ही संधी उपलब्ध करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज करून यामध्ये सहभागी होता येणार आहे.

ऑनलाईन अर्जानंतर मार्गदर्शन व मदत
 शासन व अमेरिकी दूतावासाचा उपक्रम
 कौशल्य विकास विभागाचा पुढाकार

कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या पुढाकाराने राज्यातील महिला उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. यासाठी राज्यभरातून अर्ज मागविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला उद्योजकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अमेरिकी दुतावासाच्या देखील सहभाग आहे. तसेच अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अॅन्ड इनोवेशन रीसर्च ( एसीआयआर ) ही कंपनी उभारताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करणारी संस्था यामध्ये सहभागी आहे. उद्योगाचा विकास कसा करावा, तसेच स्टार्ट अप अर्थात नव्या उद्योजकाला वित्तपुरवठा कुठून मिळेल, गुंतवणूकदार कसे मिळतील आणि आपला उद्योग ग्राहकाभिमुख कसा होईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.महिला उद्योजकांनी http://www.mahawe.in/ या ( महावे ) संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी रुची सिंघानिया 7208257689 व अमित कोठावडे 9420608942 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या वेबसाईटवर एकदा अर्ज केल्यानंतर अर्ज शॉर्टलिस्ट अर्थात निवडल्या जाईल. योग्य अर्जदारांना आमंत्रित केल्या जाईल.महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार हे नाविण्यपूर्ण उपक्रम, स्टार्टअपचे संस्थापक किंवा सह-संस्थापक असावेत, अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. सर्व वर्ग इंग्रजीमध्ये असल्याने सहभागींना इंग्रजीचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे भारतीय राष्ट्रीयत्व असणे आवश्यक आहे. आणि ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत.

येत्या जागतिक महिला दिनाला अर्थात 8 मार्चला ऑनलाइन प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे महिलांसाठी ही सुवर्ण संधी असून नागपूर महानगर व जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. अर्ज व अन्य अडचणी संदर्भात कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाशी संपर्क साधता येईल. तथापि, यासंदर्भात उपलब्ध असणाऱ्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.