महागाव (बुज) ग्रापंतील बल्ब प्रकरणाची चौकशी करा : रवी नेलकुद्री

249

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या महागाव (बुज.) ग्रामपंचायत मध्ये एलईडी बल्ब खरेदी प्रकरणात लाखोचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी आपल्या केली असुन सदर प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रारीतून पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

महागाव (बुज.) ग्रामपंचायतमध्ये सन 2020-21 मध्ये तेथील तत्कालीन ग्रामसेविका यांनी गाव प्रकाशमय करण्यासाठी लाखो रुपयांच्या विद्युत साहित्यांची खरेदी केली. परंतु या खरेदीत पारदर्शीपणा नसल्याची बाब तेथील नागरिकांनी अहेरीचे भाजपा तालुकाध्यक्ष रवि नेलकुद्री यांना सांगितली. त्यामुळे नेलकुद्री यांनी माहिती अधिकारात अर्ज करून सदर खरेदी प्रक्रियेची संपुर्ण माहिती मागविली असता, सदर खरेदी ही नियमानुसार वृत्तपत्रात जाहिरात न देता केवळ गडचिरोली येथील दुकानातून केली असुन कुठल्या कंपनीची वस्तु खरेदी केली, याचा उल्लेख खरेदी केलेल्या बिलात नाही.

कुठलीही शासकीय खरेदी करीत असतांंना एकतर स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन दरपत्रक मागवायचे असते किंवा लहान स्वरुपात खरेदी असल्यास सूचना फलकावर त्या खरेदी संदर्भात जाहिरात लावायची असते. त्यांनी सूचना फलकावर खरेदी संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली असती तर स्थानिक पातळीवरील दुकानदारांकडुन दरपत्रक सादर करण्यात आले असते. परंतु असे केले नाही. शिवाय स्थानिक कुठल्याही दुकानातून दरपत्रक मागविण्यात आलेले नाही. येथून गडचिरोलीचे अंतर साधारण 100 किमीहून अधिक असून जिल्ह्याच्या ठिकाणावरून दरपत्रक कसे काय सादर झाले? जिल्ह्याच्या ठिकाणावरील दुकानदारांना खरेदी संदर्भात माहिती मिळते परंतु स्थानिक व तालुकास्तरावरील दुकानदारांना या खरेदी संदर्भात कसे काय कळले नाही? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहे. त्यामुळे सदर खरेदी ही जाणीवपूर्वक गडचिरोली येथुन केली आहे. शासकीय कार्यालयात खरेदी केलेल्या संपुर्ण वस्तुंची साठापंजित नोंद करण्यात येते. परंतु ग्रामसचिवांनी साठापंजीची माहिती निरंक म्हणून माहिती अधिकारात लिहुन दिलेली आहे. त्यामुळे बल्ब खरेदी किती झाली, याचा देखील संशय आहे.

सदर माहितीमध्ये काही बिले ही एकाच रक्कमेची आणि एकाच वस्तुचे परंतु वेगवेगळ्या महिन्याचे असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून स्पष्ट होते की सदर बिले ही बनावट स्वरूपाची आहे. ग्रामपंचायतमध्ये खरेदी ही तेथील मंजुर आराखड्यातून करण्यात येते परंतु सदर खरेदी 14 वित्त आयोगातून करण्यात आली आणि सदर बाब त्या आराखड्यात निदर्शनास आली नसल्याने शासकीय नियमाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते. तेव्हा संपूर्ण खरेदी प्रक्रियेची निष्पक्ष सखोल चौकशी करून संबंधितांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करीत झालेल्या नुकसानीचे त्यांच्या वेतंनातून कपात करावी, अशी मागणी नेलकुद्री यांनी केली आहे. सदर कार्यवाही तत्काळ सुरू न झाल्यास किंवा दोषींना पाठीशी घातल्यास स्थानिक अहेरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी तक्रारीतून दिला आहे. अजुनपर्यंत तक्रारीची प्रत माझ्या टेबलावर आलेली नाही. तक्रार प्राप्त होताच चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे अहेरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रतिक चन्नावार यांनी सांगितले. याबाबत महागाव (बुज.) येथिल तत्कालीन ग्रामसेविका यांच्याशी दोनदा संपर्क साधन्याचा केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.