चला, जातीअंताच्या दिशेने

217

“जातिचा कारखाना”

माकडापासून माणूस कसा बनला हा चार्ल्स डार्विन यांचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत
मग तोच माणूस तेली, माळी, कुणबी, ब्राह्मण, हरिजन कसा झाला हा ‘जातिच्या कारखान्याचा सिध्दांत’ !

सिमोन द बोव्हुआर या जगप्रसिद्ध फ्रेंच लेखिकेचे तिच्या ‘द सेकंड सेक्स’ या स्त्रीवादावरील बायबल समजल्या जाणाऱ्या ग्रंथातील एक विधान फारच प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ‘स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’.छोटसचं पण किती अर्थपूर्ण विधान आहे ना हे! अगदी याचप्रमाणे ‘माणूस, तेली, माळी, कुणबी म्हणून जन्मत नाही तो तसा घडविला जाते ‘ असे माझे ठाम मत आहे! .

एकदा इन्स्टाग्राम वर मी एक फारच अर्थपूर्ण कोट वाचला,
‘Children play with everyone.Until a parent tells them not to. Nobody is born Eacist.’
खरचं! अगदी माझ्या अंतकरणाला भिडलेत हे शब्द. या ओळींशीच निगडीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बालपणातला एक अनुभव मी येथे सांगते, गांधीजी लहान असतांना उकाभंगी नावाचा एक दलित समाजातील त्यांचा मित्र होता.ही बाब त्यांच्या घरच्यांना माहिती नव्हती.पण एकदा मात्र गांधीजींच्या आईला गांधी त्या मित्राबरोबर काहीतरी गोड खाद्यपदार्थ एकाच डब्यात खातांना दिसले ते दृश्य बघून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी त्याच क्षणी गांधींना टोकले. ‘तो मुलगा दलित समाजातील असून तू त्याच्याशी मैत्री करायची नाही आणि पुन्हा असं एकाच थाळीत मिळून खाण्याचा मूर्खपणा तर अजिबात करायचा नाही’ असे खडे बोल त्यांनी गांधीजींना सुनावले. लहानग्या मोहनला मात्र त्याने नेमकी काय चूक केली तेच कळेना? काहीही असो यानिमित्ताने गांधीजींनी आयुष्यात पहिल्यांदाच जातीवादाचे भयाण स्वरूप अनुभवले होते.

बघा ना! आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असेच काहीतरी घडत असते. कदाचित इतके टोकदार नाही पण बहुतांश यालाच मिळते जुळते…

प्रत्येक घरात हाडा, मांसा, रक्ताचा, समान शरीररचना असलेला, भूक-तहानीने व्याकूळ होणारा माणूसच जन्माला येत असतो. त्या निरागस जिवाला कुठे कळते हो… काय जात? आणि काय धर्म? काय असते उच्च-नीचता? आणि काय असते लिंगभेद? जिथे प्रेम मिळेल तिथे खेचत जाणारे निष्पाप जीव असतात ते! मग प्रेम देणारे महालात राहणारे असोत वा झोपडीत राहणारे असोत… ही निरागस पिल्ले कुठलाच भेदभाव न करता स्वच्छ मनाने सगळ्यांतच मिसळतात. मग जसजशी ही मुले मोठी होत जातात,ज्या वातावरणात वाढतात, जे संस्कार या बालमनावर पडतात तशी ही मुले घडतात. ‘आई मूल जन्माला घालते आणि अनुभव व्यक्तीमत्त्व जन्माला घालतो’ अगदी असेच काही. मग जे कुणब्याच्या घरी जन्मलेत ते कुणबी, ब्राह्मणाच्या घरी जन्मलेत ते ब्राह्मण, तेल्याच्या घरी जन्मलेत म्हणून ते तेली आणि माळ्याच्या घरी जन्मलेत म्हणून माळी. आणि हास्यास्पद बाब ही की कुणाच्याच शरीरावर कुठेच हा जातीचा मुद्रांक (Stamp) बघावयास मिळणार नाही पण एकदाचा काय माणूस जन्माला आला तर मृत्युपर्यंत हा जातिचा अघोषित,अदृश्य मुद्रांक घेऊनच त्याला समाजात जगावे लागते. हाच जातिचा अघोषित,अदृश्य मुद्रांक कधीतरी कुठेतरी त्याच्या अपमानास कारणीभूत ठरतो,कधी आरक्षणाच्या माध्यमातून त्याच्या स्वप्नपूर्तीत विघ्न उत्पन्न करतो,या मुद्रांकामुळेच कधीतरी त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहातून वेगळे असल्याची अनुभूती येते तर कधी याच जातिच्या अघोषित,अदृश्य मुद्रांकामुळे त्याला त्याच्या प्रिय व्यक्तीबरोबर आयुष्य जगण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागते. आणि इतिहासाच्या पानात वाचलेल्या जातिवादाची अनुभूती जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात मानव अनुभवतो, जगतो तेव्हा आपण खरचं विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाता मारणाऱ्या,चंद्र,मंगळावर स्वारी केल्यानंतर आता मंगळाच्याही पलीकडे झेप घेऊ पाहणाऱ्या,पुरोगामी विचारसरणीच्या फुशारकी मारणाऱ्या २१ व्या शतकातच जगतोय ना? हा प्रश्न आपल्याला पडतो.

मूळातच हे तेली, माळी, कुणबी, ब्राह्मण, हरीजन … ही जातिव्यवस्था आहे तरी काय? मी तर म्हणेल, ही जातिव्यवस्था म्हणजे एक मानसिक आजार आहे. १३५ कोटी भारतीयांना गेल्या २००० वर्षापासून जडलेला मानसिक आजार!
कारण,या जातिव्यवस्थेला विज्ञान,अध्यात्म तसेच चार्ल्स डार्विन यांचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत या कुणाचाच आधार नाहीये. इतकेच काय… ईश्वरावर श्रध्दा ठेवणाऱ्या आस्तिकाच्या दृष्टीकोनातून बघितले तरीदेखील काहीच तथ्य आढळणार नाही. कारण, ईश्वराला किंवा निसर्गाला जर का मानवामध्ये जातिच्या आधारावर असा भेदभाव करावयाचा असता तर कदाचित जातिनुसार ईश्वराने किंवा निसर्गाने मानवाच्या संरचनेत किंवा मानवी शरीरातील एखाद्या जैविक प्रक्रियेत तसा भेदभाव केला असता.

इथे मला ‘झूठन’ या प्रसिद्ध ग्रंथांचे (आत्मचरित्र) लेखक ओमप्रकाश वाल्मिकीजी यांच्या कवितेतील काही ओळी आठवतात
‘मेरी माॅं ने जने सब अछूत ही अछूत तुम्हारी माॅं ने सब बामन ही बामन, कितने ताज्जुब की बात हैं जबकि प्रजनन-क्रिया एक ही जैसी हैं!’

बघा ना, मानवी कल्पनेच्या कितीतरी पलीकडे गणित असलेल्या या समस्त ब्रम्हांडाची निर्मिती करणाऱ्या, या अफाट ब्रम्हांडाचे संचालन करणाऱ्या त्या सर्व शक्तीशाली अकल्पित शक्तीनेच (ज्याला अधिकांश लोक परमेश्वर म्हणतात) मानवामध्ये कुठल्याच प्रकारचा तिळमात्र सुद्धा भेदभाव केला नाहीये, तर या अफाट ब्रम्हांडात ज्याचे वाळूच्या कणाइतकेही अस्तित्व नाही त्या स्वार्थी मानवाला हा अधिकार कोणी दिलाय की त्याने असली तर्कहिन,अमानवीय जातिव्यवस्था निर्माण करून त्या आधारावर मानवामध्ये भेदभाव करावा?

एक आश्चर्यची बाब ही देखील आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा एकीकडे काही मंडळींचा राष्ट्राच्या स्वातंत्र्याकडे भर होता तेव्हाच दुसरीकडे काही विद्वानांनी समाजसुधारणेचा पुरस्कार केला होता. बऱ्याच विद्वानांचे असे मत होते की जर का आपण पाश्चिमात्य शिक्षण घेतले तर आपल्या भारतीय समाजाला कलंक असलेल्या कितीतरी समस्या सहजासहजी सुटणार. पण शोकांतिका ही की आज स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण होत असतांना, समाजात शिक्षणाचा ( विशेषतः पाश्चिमात्य शिक्षणाचा) इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार झाल्यावर देखील कित्येक अनिष्ट,रूढीवादी चालीरिती आजही जश्यास तश्या बघावयास मिळतात. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजेच ही २००० वर्षापूर्वी जन्मलेली व आजही समाजात (नाही काही तर लोकांच्या मनात!) घट्ट पाय रोवून बसलेली जातिव्यवस्था! याला आपण काय म्हणावे? आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश, की आपल्या शिक्षण व्यवस्थेने डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी घडविलेत पण विश्वाकडे निकोप दृष्टीकोनातून बघणारे, विश्वबंधूत्वाचे पालन करणारे व साधी माणूसकी जपणारे माणूसच घडविले नाहीत! की याला घराघरांतील ‘जातिच्या कारखान्यांचे’ देदीप्यमान यश म्हणावे की माणूस, माणूस होण्याच्या आधी तेली आहे, माळी आहे, कुणबी आहे आणि कदाचित यानंतर तो माणूस आहे!

निसंदेह! आपण पाश्चिमात्य शिक्षण घेऊन विद्याविभूषित झालोत, पाश्चिमात्यांसारखे पोशाख परिधान करायला लागलोत,त्यांचा पिझ्झा, बर्गर मोठ्या आवडीने खायला लागलोत, धडाधड इंग्रजी बोलायला लागलोत आणि अश्याप्रकारे आम्ही किती उच्चशिक्षित, आधुनिक आणि पुढारलेले आहोत याची फुशारकी मारायला लागलोत. खर तर, पाश्चिमात्य संस्कृतीचे वारे अख्ख्या जगभर पसरलेले आहेत आणि या आधुनिक मानल्या जाणाऱ्या संस्कृतीचे अनुकरण करण्यात वावगे असे काहीच नाही (पण हाह्ह… स्वतःच्या सर्वश्रेष्ठ संस्कृतीला विसरता देखील कामा नये!)

पण,मला संताप तर तेव्हा येतो की अशाप्रकारे पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारे हे महाशय जेव्हा स्वतः च्या लेकरांना बजावतात की ‘जातिच्या बाहेरचा जोडीदार शोधला तर तुझी खैर नाही’
आणि मला प्रश्न पडतो,नेमकं अश्याच संवेदनशील बाबतीत जेव्हा आपणास पाश्चिमात्यांच्या पुरोगामीत्वाचे अनुकरण करायला हवे तेव्हा या सो कॉल्ड उच्चशिक्षित,आधुनिक आणि पुढारलेल्या मंडळींची अक्कल काय तेल घ्यायला गेली असते काय?
इथे मी माझ्या ‘जाता नाही जात ती म्हणजे जात’ या कवितेतील काही ओळींचा उल्लेख करतेय

‘सर्वधर्मीय सहिष्णुतावादी विचार आमचे
आधुनिक युक्तिवादी आचरण आमचे
म्हणूनच आलिंगन घालतो एकमेकांस
मग असो तो हिंदू किंवा मुसलमान
पण आंतरजातीय विवाहाचे नाव घेताच फुटतो आम्हाला घाम
स्वार्थापोटी सोबत नांदतो आम्ही
पण लाडकी आम्हाला आमची जात
जाता नाही जात ती म्हणजे जात’

समाज वरवरून कितीही देखावा करीत असला. तरी वर्तमानपत्रात कधी कोण्या आर्ची-परश्याच्या प्रेम कहाणीचा दारूण अंत झाल्याचे आपण वाचतो, तर कधी जातिवादी दंगली तर कधी दलितांवरील अत्याचार,याबाबतीत उत्तरेकडील राज्यांची परिस्थिती तर आजही फारच बिकट आहे, आजही दलितांना सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. मंदिर प्रवेशापासून रोखले जाते. दलित समाजाचा एखादा तरूण लग्नात घोड्यावर बसला, तर त्याच्यावर हल्ल्याच्या घटनाही घडतात. ग्रामीण भागात अजूनही जातीय आधारावर गाव वसते. दलितांची वस्ती अर्थातच गावाबाहेर असते. आणि या असल्या मानवतेला अशोभनिय प्रकारांबाबत वाचून,ऐकून मन अगदी सुन्न पडतेय. माझी नव्या पिढीला अशी कडकडून विनंती आहे की निदान त्यांनीतरी शिक्षणाकडे निव्वळ नोकरी मिळविण्याचे किंवा उपजिविकेचे साधन म्हणून न बघता, शिक्षित होऊन समाजातील बिकट प्रश्नांकडे एक आव्हान म्हणून बघितले पाहिजे. माझ्या परीने, माझ्या पातळीवर समाजातील ही घाण स्वच्छ करण्याकरिता मी कसा काय खारीचा वाटा उचलू शकतो? याचा सदसद्विवेकबुद्धीने प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. एक खर आहे, आज जो तो सोबत मिळून खातो-पितो, उठतो-बसतो आहे पण ‘कुणबी समाज वर-वधू परिचय मेळावा’, ‘तेली समाज संस्था’, ‘अखिल भारतीय ब्राह्मण समाज संस्था’ किंवा ‘दलित समाज संस्था’ आणि मग या संस्थांना आपापल्या समाजाच्या महापुरुषांची नावे, मग ते निळे-भगवे झेंडे,…
या आपापल्या जातीच्या उद्धाराकरीता मांडलेली ही दुकाने कळत-नकळत समाजात तेली, माळी, कुणबी, ब्राह्मण,हरीजन अश्या जातिच्या भिंती उभारतात.
आणि कळत-नकळत समाजात भेदभाव जन्माला घालतात.
अरे! नोकरी, रोजगार, आरक्षण, महागाई, लग्न समारंभ, वर-वधू परिचय मेळावे या काय एका विशिष्ट जातिच्याच समस्या आहेत काय? या तुम्हा आम्हा प्रत्येकाच्याच समस्या आहेत. मग भरू द्या ना ‘आंतरजातीय वर-वधू परिचय मेळावे’, करूया ना सगळे मिळून एखादे आंदोलन या जातिव्यवस्थेविरोधात, भरवूया ना ‘मानव समाज कल्याणकारी संस्था’, आणि सतीप्रथा, केशवपन प्रथा, अस्पृश्यता असल्या कुप्रथेंप्रमाणेच या जातिव्यवस्थेला देखील इतिहासाच्या पानांत दफन करूया. जेणेकी एक अशी पिढी जन्माला येणार ज्यांची जात भारतीय आणि धर्म मानवता असणार आणि ही निरागस पिल्ले इतिहासाच्या पानांत वाचणार, येथून फार वर्षापूर्वी अशी-अशी अमानवीय आणि मानवी संस्कृतीला अशोभनिय जातिव्यवस्था समाजात अस्तित्वात होती जी माणसांना नव्हे तर तेली, माळी, कुणबी, ब्राह्मण, हरिजनांना जन्माला घालायची. आणि भविष्यातील ही पिढी टि. व्ही. वर ‘सैराट’ चित्रपट पाहून आश्चर्यचकित होणार सोबतच या विचाराने सुखावणार की आता मात्र समाजात या कुप्रथेला काहीच स्थान नाही यामुळेच आता मात्र आम्ही आमच्या आवडीनुसार कुणालाही जोडीदार म्हणून बिनविरोध निवडू शकतो.
आणि हा बाबासाहेबांच्या स्वप्नातील खराखुरा जातिमुक्त भारत तेव्हाच जन्माला येणार जेव्हा घराघरातील ‘जातिच्या कारखान्यांना’ कायमचा लगाम बसणार!

-निकिता अनु शालिकराम बोंदरे
पत्ता – कोराडी,नागपूर
ईमेल – nikitabondre1234@gmail.com