गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचा आत्मसपर्पण,माओवाद्यांना मोठा धक्का

519

गडचिरोली :- विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल कुजूर (वय २६) आणि रोशनी पल्लो (वय ३०) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे नाव आहे. माओवाद्यांच्या कारवायांना कंटाळल्याने आत्मसमर्पण केले असल्याचे या दोघांनी सांगितले.

आत्मसमर्पण केलेला माओवादी अनिल कुजूर हा २००९ मध्ये माओवाद्यांमध्ये सामिल झाला होता. त्यानंतर त्याने कसंसुर आणि मिलितियामध्ये काम केले आहे. खोबरमेंढामध्ये २०११ मध्ये झालेल्या चकमकीत अनिल सामिल होता. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. तर, पाच जवान जखमी झाले होते. त्याशिवाय, निहायकल आणि ग्यारापट्टी दरम्यान झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता. यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले होते. त्याच वर्षी जंगलात झालेल्या आणखी एका चकमकीत तो सहभागी झाला होता.

अनिल कुजूरने सांगितले की, सरकारकडून लोकांच्या हितासाठी विविध योजना सुरू आहेत. त्याचा लोकांना फायदा होतोय हे माओवादी मानण्यास तयार नव्हते. आपल्या फायद्यासाठी वरिष्ठ माओवाद्यांकडून गरीब आदिवासींचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. माओवाद्यांच्या दलममधील सदस्य विवाहित असल्यास त्याला स्वतंत्रपणे आयुष्य जगता येत नाही. गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यामुळे आता जंगलात राहणे सुरक्षित नाही. त्यातच वरिष्ठ नक्षलवादी नेते हे चळवळीचा पैसा स्वत: च्या खासगी खर्चासाठी वापरत असल्याचा दावा अनिल कुजूरने केला.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले की, महिला माओवादी रोशनी २००९ पासून माओवादी चळवळीचा हिस्सा झाली होती. ती माओवाद्यांच्या तांत्रिक विभागात काम करत होती. त्याशिवाय डेप्युटी कमांडर म्हणूनही तिने जबाबदारी पार पाडली आहे. वर्ष २०१५ मध्ये कुंडलातील जंगलात झालेल्या चकमकीत ती सामिल होती. वर्ष २०१५ च्या अखेरीस इरापनेरमध्ये तिने तीन निरपराधांची हत्या केली होती.

रोशनीने सांगितले की, माओवाद्यांमध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जाते. महिला नक्षलवादीला प्रमुख जबाबदारी दिली जात नाही. चकमकीच्या वेळी पुरुष नक्षलवादी पळ काढतात. मात्र, महिलांना पळ काढता न आल्याने त्या ठार होत असल्याचे रोशनीने सांगितले.

अनिल हा एटापल्ली तालुक्यातील रहिवासी आहे तर रोशनी छत्तीसगडच्या नारायणपूरची रहिवासी आहे. गेल्या दोन वर्षात एकूण ५१ नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली टाकत गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.