सीटी-१ पाठोपाठ आता टी-६ वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी

522

प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

डचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील वनविभागाची चमू पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रात दाखल झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सीटी -१ वाघाला कित्येक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात यश आले होते. त्यानंतर आता टी-६ या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करणे वन विभागासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

गडचिरोली वनवृत्ताच्या वडसा वनविभागातील पोर्ला व गडचिरोली वनविभागातील चातगाव वनपरिक्षेत्रात समाविष्ट गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाघांचा वावर आहे. चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजगाटा चेक येथील व्यक्तीचा या वाघिणीने बळी घेतला होता. तेव्हापासून ह्या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत याच परिसरातील १३ लोकांचे बळी वाघांनी घेतले. यात टी-६ वाघिणीने ५ नागरिकांना ठार केले आहे. त्यामुळे या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत गडचिरोली वनवृत्ताने मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडे हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार दोन चमू येथे दाखल झाल्या असून ३० नोव्हेंबरपर्यंत वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.