पोलिस भरती घ्या, अन्यथा आंदोलन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांचा इशारा

471

 

चंद्रपूर : राज्याच्या गृहविभागाने सुमारे १५ हजार पदांची पोलिस भरती घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्यातील उमेदवारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु, राज्याच्या प्रशिक्षण व विशेष पथकाचे पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी परिपत्रक काढून प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गृहविभागाने रद्द केलेली पोलिस भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांनी दिला आहे.
पोलिस भरतीची प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे गृहविभागाने जाहीर केले. त्यानंतर मागील अनेक वर्षांपासून पोलिस बनण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. परंतु, राज्याच्या प्रशिक्षण व विशेष पथकाचे पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी पोलिस भरती प्रक्रिया रद्द करण्याचे जाहीर करून पुन्हा एकदा उमेदवारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अडूर यांनी केला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात येऊ घातलेले मोठे उद्योग आपल्या नाकर्तेपणामुळे परप्रांतात जाऊ दिले. यामुळे राज्यातील युवकांना रोजगारापासून मुकावे लागले आहे. तर, दुसरीकडे पोलिस भरती प्रक्रिया रद्द करून उमेदवारांच्या आशेवर पाणी फेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे राज्यात रद्द केलेली पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करून राज्यातील सर्व जिल्ह्यात भरती प्रक्रिया एकाचवेळी राबवावी, अशी मागणी अडूर यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजेश मुरली अडूर, जिल्हा उपाध्यक्ष रमीज शेख, मोनू रामटेके, महासचिव प्रकाश देशब्रतार, प्रवीण अडूर, श्रीकांत वडलुरी, श्रीनीवास इदुनुरी, सिन्नू अण्णा, प्रज्वल आंवले, अजय चिनुरवार, तेजस दवे, अमित कुमरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पाठविण्यात आल्या आहेत.