विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा…तब्बल तीन महिन्यानंतर फोन रेकॉर्डिंगमुळे झाला घटनेचा भांडाफोड

640

विवाहबाह्य संबंध जपताना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीची हत्या करुन त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतू, आरोपी महिलेच्या फोन रेकॉर्डींगमुळे घटनेचा भांडाफोड झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी परीसरातील गुरुदेव नगर येथे ही घटना उघडकीस आली. शाम रामटेके असे मृताचे नाव आहे. ते 66 वर्षांचे होते. धक्कदायक म्हणजे हत्या होऊन सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर सुमारे 3 महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आले.

शाम रामटेके आणि रंजना रामटेके या दाम्पत्यास दोन मुली आहेत. त्या नागपूरला लाहतात. 6 ऑगस्ट रोजी या दोन्ही मुलींना आईने (रंजना) कळवले की हृदयविकाराचा झटका आला आणि वडीलांचे (शाम रामटेके) निधन झाले. दोन्ही मुली आल्या त्यांनाही दु:ख झाले होते. त्यांनी आईच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन वडीलांवर अंत्यसंस्कार केले आणि त्या आल्या पावली परत गेल्या. पुढचे तीन महिने शाम रामटेके यांचा नैसर्गीक मृत्यूच झाला असे समजून सर्व राहात होते.

दरम्यन, सर्व प्रकरण शांत झाले. नातेवाईकही ती गोष्ट विसरुन गेले. पतीच्या मृत्यूनंतर रंजना रामटेके एकट्याच राहु लागल्या. काही दिवसांनी त्यांच्या दोन मुलीही आईसोबत राहण्यासाठी ब्रह्मपूरी येथे दाखल झाल्या. त्यातील एका मुलीने काही कारणांनी आपल्या आईचा फोन वापरायला घेतला. या वेळी तिला लक्षात आले की, आईच्या फोनमध्ये काही रेकॉर्डींग्ज आहेत. त्यातील काही रेकॉर्डींग्ज तिने ऐकले. ती ऐकताच तिला धक्का बसला.

आईचे विवाहबाह्य संबंध होते. त्या संबंधात वडीलांचा अडथळा होत असल्याने आईनेच वडिलांची हत्या केली. ही हत्या लपविण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले. धक्का बसलेल्या आणि घाबरलेल्या आवस्थेत मुलींनी पोलीस स्टेशन गाठले आणि मग सर्वच कृत्याचा भांडाफोड झाला. मुलींनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांना अटक केली आहे.