घरी पोहोचण्याआधीच ‘त्या’ चिमुकल्यावर काळाने घातली झडप.

854

प्रतिनिधी:दिलीप सोनकांबळे
*परतवाडा (अमरावती) :* वडील शेतात बैलगाडी घेऊन निघाले. मागे सहा वर्षांचा सोहम बसला. काही अंतरापर्यंत त्याच्या प्रवासाचा हा डाव, नंतर तो घरी, तर वडील शेतात जाणार होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते, चिमुकला बैलगांडीतून उतरून घराकडे जायला निघाला आणि काळाने झडप घातली, एका चारचाकी वाहनाने त्याला रस्त्यावरच चिरडून ठार केले.
बापासमोर पोटच्या गोळ्याचा क्षणात जीव गेला, रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून असलेल्या चिमुकल्याला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिवाचा थरकाप उडणारी ही घटना सरमसपुरा पोलीस स्टेशनांतर्गत असलेल्या अचलपूर-रासेगाव मार्गावर मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली. सोहम सुधीर चौखंडे (वय ७,अब्बासपुरा, अचलपूर) मृताचे नाव आहे.
अकोटवरून आलेल्या चार चाकी पीकअप (एम एच ३० बीडी ४७०३) या वाहनाने त्याला चिरडले सरमसपुरा पोलिसांनी फिर्यादी अंकित राजेंद्र चौखंडे (२५, रा. अब्बासपुरा) यांच्या तक्रारीवरून भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात करणाऱ्या आरोपी चालक वैभव नाजूकराव नांदूरकर (२५, हनुमाननगर, आकोट) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत.