धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा – माजी मंत्री वडेट्टीवार शेतकरी आर्थिक विवंचनेत – अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट

394

विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांना यंदाचे वर्षी अतिवृष्टीच्या फटका बसला असून यामुळे लाखों हेक्टर शेती मधील धान पिके उध्वस्त झाली. अशा दुष्काळ परिस्थिती धन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने किमान ५०० रुपये प्रतिक्विंटल बोनस नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करावा अशी मागणी राज्याची माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा, गोंदिया हे प्रमुख धान उत्पादक जिल्हे आहेत. अशातच यंदाचे वर्षी धो -धो पडणाऱ्या पावसामुळे वरील जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो हेक्टर मधील धान पिके पूर्णतः उध्वस्त झाली. हंगाम पूर्व नियोजन, शेत पीके संगोपन, व मजूर खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हाती निम्मेही उत्पन्न आले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची जाणीव आहेत. मात्र शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत ही अतिशय तोकडी असून डोक्यावर बँकेचे कर्ज सावकारी व हात उसने कर्ज यामुळें पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले असून येथील शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस दिला होता. यंदाचे वर्षी त्याहूनही अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पैशा अभावी शेतकऱ्यांनी आगामी हंगामात शेती व्यवसाय करायचा कसा ? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. अशा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशाच्या पोशिंद्याला मदतीची नितांत गरज असून उपराजधानी नागपूर येथे १९ डिसेंबर २०२२ पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व पहिल्याच सत्रात पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यातील दान उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर करावा अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे