होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी कटीबद्ध ! – धम्मज्योती गजभिये (महासंचालक, बार्टी)

835

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था असून राज्यातील अनु. जातीतील ५९ समाज घटकांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी कार्य करत आहे. अनु.जातीतील होलार समाज हा विकासा पासून वंचित आणि उपेक्षित आहे. राज्यात अनु.जातीत अत्यल्प असलेला होलार समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी बार्टी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी होलार समाजप्रतिनिधी यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

सोमवार, दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी बार्टी मुख्यालयात होलार समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासंचालक बार्टीच्या विविध योजनाची माहिती देत म्हणाले की, अनु.जातीतील प्रत्येक समाज घटकाच्या उत्थानासाठी बार्टी-संशोधन, प्रशिक्षण, योजना, कौशल्यविकास, विस्तार व सेवा, जात पडताळणी इत्यादी विभागा मार्फत विकासाच्या अनेक योजना राबवीत आहे. यामध्ये यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, बँकिंग सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मोफत निवासी वर्ग तसेच विविध कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य बार्टी करत आहे. बेंचमार्क सर्वेक्षण या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व शासकीय योजनांचे सर्वेक्षण करून अनु. जातीचे सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाचा अभ्यास करत आहे. युवागटाच्या माध्यमातून उद्योजक निर्मितीचा ध्यास बार्टीने घेतला आहे. या सर्व योजनांमध्ये उपेक्षित वंचित असलेल्या होलार समाजाचा प्रामुख्याने विचार करून बार्टी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे. या सर्व योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी तात्काळ कृती आराखडा सादर करण्याचे आदेश यावेळी उपस्थित सर्व प्रकल्प व्यवस्थापक यांना देण्यात आले.
तसेच बेंचमार्क सर्वेक्षणबाबत सादरीकरण करण्यात आले.
यावेळी होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव आयवळे आणि आलेल्या समाज प्रतिनिधींनी अनु.जातीच्या विकासासाठी बार्टी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे होलार समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या वेळी बार्टीच्या निबंधक तथा विभागप्रमुख स्नेहल भोसले, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, डॉ. प्रेम हनवते, डॉ. सारिका थोरात, शुभांगी सुतार, डॉ. संभाजी बिरांजे, विशाखा शहारे व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संशोधन विभागाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. छायाचित्रण राहुल कवडे यांनी केले.